मुंबईतील एनएमजोशी पोलिस स्टेशनमध्ये चाललंय काय?

तुमचा पत्ता बरोबर आहे, तुम्ही त्याच जागी राहत आहात, तुम्ही योग्य माहिती पासपोर्टच्या फॉर्मवर लिहली आहे, तरीही तुम्हाला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी हवालदार त्रास देतोय का?, त्याचा 'अर्थ' तुम्हाला अजून कळत नाहीय का? 

Updated: Feb 25, 2015, 10:06 PM IST
मुंबईतील एनएमजोशी पोलिस स्टेशनमध्ये चाललंय काय? title=

मुंबई : तुमचा पत्ता बरोबर आहे, तुम्ही त्याच जागी राहत आहात, तुम्ही योग्य माहिती पासपोर्टच्या फॉर्मवर लिहली आहे, तरीही तुम्हाला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी हवालदार त्रास देतोय का?, त्याचा 'अर्थ' तुम्हाला अजून कळत नाहीय का? 

त्याचा 'अर्थ' तुम्हाला कळत नसेल तर सावध रहा, शांत बसा, काहीही बोलू नका, अन्याय सहन करा, हवालदाराच्या सिनिअर साहेबांना भेटण्याचाही प्रयत्न करू नका, नाहीतर तुमचा पासपोर्ट तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला दुसऱ्या केसमध्येही अडकवलं जाण्याचीही शक्यता आहे.

असं सांगण्याचं कारण, मुंबईतील एन एम जोशी पोलिस स्टेशनमधील 'एक' हवालदार जो पासपोर्टचं व्हेरिफिकेशन करतो, तो लोकशाही मानत नसावा, त्याला काही शिकवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तो तुम्हाला सांगेल, "तुझं वय जेवढं आहे, तेवढी माझी पोलिस दलात सेवा झालीय", अशी सेवा असेल तर 'मेवा' किती जमा झाला असेल, असा प्रश्न देखिल मनात आणू नका, कदाचित हा देखिल गुन्हा असेल, हे देखिल व्यक्ती स्वातंत्र्यात बसत नसेल, असं तुम्हाला तेथील वातावरणावरून वाटेल.

राकेश मारियांकडे तक्रार करेन असं सांगू नका, नाहीतर....

आणि तरीही तुम्ही त्या हवालदाराची सिनिअर पीआय पाटणकर यांच्याकडे तक्रार केली, आणि राकेश मारियांना सांगेन असं हवालदारला सांगितलं, तर मग पीआयच्या केबिन बाहेर आल्यानंतर तो तुमचा मोबाईल काढून घेईल, तासभर तुम्हाला आरोपी सारखा बसवून ठेवेल, येणार जाणारे पोलिस तुम्हाला विचारतील, काय रे... काय केस होती? (तुम्ही तुर्तास आरोपी असाला, शांत बसण्याशिवाय तुम्हाला पर्याय नसेल)

राकेश मारियांचं नाव घेतल्याने, चौकशी करून येता असं म्हणणारा हवालदार तासाभरात येईल, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी जाऊन खात्री करून आला असेल, असं तुम्हाला वाटेल, कारण पीआय साहेबांनी सांगितल्यावर हा हवालदार नव्याने व्हेरिफिकेशन करून आलेला असेल, असं कुणालाही वाटू शकतं.

मारिया साहेब, यालाचं म्हणायचंय का 'सद्रक्षणाय'

मग तुम्ही घरी गेल्यावर आजू-बाजूला शेजाऱयांना, रूम पार्टनर्सना विचारा, कुणी आलं होतं का, व्हेरिफिकेशनला.... कुणीही आलेलं नव्हतं असं उत्तर तुम्हाला मिळेल... मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ज्यांच्या नियंत्रणात आहे, त्या राकेश मारियांच्या मुंबईत तुम्हाला असा अनुभव आल्यावर, तुम्ही ते विसरायचं, की त्यावर चर्चा किंवा चिंता करायची, हे तुम्ही ठरवा, तुम्हाला कदाचित पासपोर्ट व्हेरिफेशनच्या प्रोसेसमधून जामीन मिळाल्यासारखं वाटेल, पण यापुढे जे पासपोर्ट काढणार आहेत, त्यांचं काय? त्यांच्यासाठी राकेश मारिया काही करणार आहेत का?, ते करणार नसतील तर मग, एनएमजोशी पोलिस ठाण्यात अशीच हुकूमशाही चालणार का? 

तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर खालील कमेंन्ट बॉक्समध्ये लिहा, या प्रतिक्रिया आपण मुंबई पोलिस कमिश्नर राकेश मारियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.