मुंबई : लोकसभेत भाजप खासदार नाना पटोले यांनी स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळलाय. शिवसेना-भाजपमध्ये यावरुन जोरदार खडाजंगी उडाळी. विधानसभेत अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अखंड महाराष्ट्र ठेवण्यासाठी शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशा इशारा सेनेचे विधीमंडळ नेते आणि महाराष्ट्र रस्ते वाहतूक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे, ती अजूनही कायम आहे. भाजप जर स्वतंत्र विदर्भाचा ठराव आणत असतील तर त्याच्या विरोधात आमची भूमिका आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. अखंड महाराष्ट्रासाठी आम्ही बांधिल आहोत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अखंड महाराष्ट्राच्या निवेदनावर शिवसेना समाधानी असून शिवसेना अशासकीय प्रस्तावाला पाठिंबा देणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, या बैठकीत गरमागरम चर्चा झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जरी बैठक झाली तरी शिवसेना या दोन्ही पक्षांसोबत वाद उफाळल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला संयुक्त महाराष्ट्राबाबत शिकवू नये, असे शिवसेनेच्यावतीने एकनाथ शिंदे यांनी त्यांना थेट इशारा देण्यात आला. गरज पडल्यास सत्तेतून बाहेर पडू. तसेच अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना कुठल्याही स्तराला जाईल, असा थेट इशारा भाजपला शिवसेनेने दिला आहे.
अखंड महाराष्ट्राचा प्रस्तावावर शिवसेनेनं कोलांटउडी घेतलीय. शिवसेना अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावर तडजोड करणार नसली तरी विरोधकांच्या प्रस्तावावरही सही करणार नसल्याचं शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळं मुख्यमत्र्यांवर शिवसेनेचा विश्वास असून विरोधकांच्या प्रस्तावावर सही करण्याचा प्रश्नच नसल्याचा मुद्दा शिंदेंनी पुढं केला आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीपासून अंतर राखण्यासाठी शिवसेनेनं कोलांटउडी घेतल्याचं बोललं जात आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आता काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली.
या बैठकीला काँग्रेसचे नेते राधाकृष्णविखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, उपस्थित होते. रामदास कदमांच्या दालनात ही बैठक झाली. तिकडे विधानपरिषदेत धनंजय मुडेंनी मुख्यमंत्र्यांनी स्वतः अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव मांडल्याशिवाय सभागृह चालूच देणार नाही असा इशारा दिलाय. दोन्ही सभागृहात आज सलग तिसऱ्या दिवशी अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू झाला. विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.