२६/११ हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालला मरेपर्यंत जन्मठेप

औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी, अबु जुंदाल याला न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय सुनावला.

Updated: Aug 2, 2016, 04:29 PM IST
२६/११ हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालला मरेपर्यंत जन्मठेप title=

मुंबई  : औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी, अबु जुंदाल याला न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय सुनावला.

दंडाची ही रक्कम भरली नाही तर अतिरिक्त एक वर्षाचा कारावास अबू जुंदालला भोगावा लागणार आहे. तसेच इतर २ आरोपींना १४ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आणखी तिघांना ८ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मात्र खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी १० वर्ष तुरूंगात काढल्याने त्यांची सुटका होणार आहे. 

अबु जुंदालसह ११ आरोपींना दोषी ठरवले होते. आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात एकूण २२ जणांना अटक झाली होती. त्यातील ११ आरोपी दोषी ठरले तर, १० जणांची सुटका झाली. लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी अबु जुंदाल मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या कटातील मुख्य सूत्रधार आहे.

 २००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडीया यांची हत्या करण्यासाठी हा कट रचला होता असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होत.  आरोपींवर मोक्कातंर्गत आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील मोक्का रद्द करण्यात आला होता.

 ८ मे २००६ रोजी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कारचा पाठलाग करुन चांदवड-मनमाड महामार्गावर दोन गाडया पकडल्या होत्या. यावेळी तीन संशयितांना अटक करुन तीस किलो आरडीक्स, दहा एके-४७ आणि ३२०० बुलेट जप्त केल्या होत्या. त्यावेळी इंडिका गाडी जुंदाल चालवत होता. पोलिसांना चकवून तिथून निसटण्यात तो यशस्वी ठरला. तो मालेगावला गेला. काही दिवसांनी तो बांग्लादेशला पळून गेला तिथून तो पाकिस्तानात गेला. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात त्याची महत्वाची भूमिका होती. २०१२ मध्ये सौदी अरेबियावरुन त्याला भारतात आणण्यात आले.