उद्धव ठाकरेंचं पुन्हा तळ्यात-मळ्यात, शिवसेना नेत्यांमध्येच मतभिन्नता!

महाराष्ट्रातील राजकारण सध्या आयसीयूमध्ये पोहोचलं आहे, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शिवसेना सध्यातरी विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे निभावेल असंही त्यांनी सांगितलं. 

Updated: Nov 18, 2014, 03:59 PM IST
उद्धव ठाकरेंचं पुन्हा तळ्यात-मळ्यात, शिवसेना नेत्यांमध्येच मतभिन्नता! title=

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारण सध्या आयसीयूमध्ये पोहोचलं आहे, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शिवसेना सध्यातरी विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे निभावेल असंही त्यांनी सांगितलं. 

भाजपा सरकार स्थिर राहण्याचा राष्ट्रवादीनं मक्ता घेतला नसून मध्यावधी निवडणुका कधीही येऊ शकतात असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलं आहे. या पार्श्वभूमिवर दुपारी केईएम हॉस्पिटलमधील आपातकालीन विभागाच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. पवार काय बोलतात हे कुणालाच कळत नाही आणि जे बोलतात ते कधीच करत नसल्यानं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही आणि जनतेनंही त्यांना माफ करावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची भेट झाल्यानंतर उद्धव - राज एकत्र येतील अशी चर्चा रंगली होती. यावर ही भेट राजकीय नव्हती, असं स्पष्टीकरणही उद्धव ठाकरेंनी दिलं. 

दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप सरकार अस्थिर होऊ देणार नाही, असं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांच्याही वक्तव्यात भिन्नता आढळून येतेय. त्यामुळं शिवसेनेचं अजूनही तळ्यात-मळ्यातच का? असा प्रश्न निर्माण होतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.