भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी सोशल मीडियावर (Social Media) एकमेकांना अनफॉलो केलं असल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. त्यातच आता युझवेंद्र चहलचा आरजे महावेशसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखीनच जोर आला आहे.
आरजे महावेशने इंस्टाग्रामला फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती ख्रिस्मस साजरा करताना दिसत असून, त्यात चहलही दिसत आहे. "Christmas lunch con familia!" अशी कॅप्शन या फोटोंना देण्यात आली आहे. यावरुन आरजे महावेश आणि युझवेंद्र चहल यांच्यात चांगली मैत्री असल्याचं दिसत आहे. आरजे महावेशने दोन आठवड्य़ांपूर्वी हे फोटो शेअर केले आहेत, मात्र ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नुकतंच युझवेंद्र चहलने इंस्टाग्रामला स्टोरी शेअर करत घटस्फोटाच्या चर्चांवरील मौन सोडलं होतं. यामध्ये त्याने सोशल मीडियावरील काही पोस्ट सत्य नसल्याचं म्हटलं आहे.
काही गोष्टींभोवती असणारी उत्सुकता, त्यातही खासकरुन माझ्या आयुष्याबद्दल मी समजू शकतो असं चहलने लिहिलं आहे. "एक मुलगा, भाऊ आणि मित्र म्हणून मी सर्वांनी उगाच या अंदाजांमध्ये अडकून न पडण्याची विनंती करतो. यामुळे मला आण माझ्या कुटुंबाला फार वेदना होत आहेत," असं त्याने लिहिलं आहे.
धनश्री वर्माने घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करत कोणताही आधार नसणारे दावे आणि ट्रोल्सना फटकारल्यानंतर 24 तासाच्या आत युझवेंद्र चहलने पोस्ट केली.
युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकंच नाही तर भारतीय क्रिकेटपटूने धनश्रीसोबतचे त्याचे सर्व फोटो देखील डिलीट केले आहेत. धनश्रीने युझवेंद्रला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं असले तरी, तिने त्याच्यासोबतचे कोणतेही फोटो डिलीट केलेले नाहीत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे की या जोडप्यामध्ये घटस्फोट होणे अटळ आहे आणि ते अधिकृत होण्यास काही काळ लागेल.
याआधी 2022 मध्येही दोघांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा होती. याचं कारण तेव्हा धनश्रीने आपल्या नावातून 'चहल' आडनाव हटवलं होतं. पण नंतर त्यांनी पोस्ट करुन सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलं होतं.
धनश्री वर्मा कोरिओग्राफर आहे. तिचे इंस्टाग्रामवर 62 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2020 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्येही ते सहभागी झाले होते.