Makar Sankranti 2025 : पंचांग, ज्योतिषविद्या आणि ग्रहताऱ्यांशी थेट संबंध असणाऱ्या मकर संक्रांत या सणाचा उल्लेख निघाला कीह काही गोष्टी ओघाओघानं पुढे येतात. मग ती सुगड पुजण्याची प्रथा असो, तिळगुळ समारंभ असो किंवा पुराणकथांमध्ये सांगितलेले काही संदर्भ असो.
मकर संक्रांतीच्या या पर्वात सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, थोडक्यात उत्तरायणाला सुरुवात होते. पुराणकथांमधील संदर्भांनुसार महाभारत युद्धावेळी गंगापुत्र भीष्म पितामह यांनी उत्तरायणाच्याच दिवशी प्राण त्यागले होते. पण, त्यांनी हाच दिवस का निवडला?
महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारत या ग्रंथात सांगितल्याप्रमाणं पितामह भीष्म यांना त्यांचे वडील शांतनू यांच्याकडून इच्छामरणाचं वरदान मिळालं होतं. त्याच कारणास्तव पितामय बाणांच्या शय्येवर असतानाही त्यांनी प्राण त्यागले नव्हते. कारण, ते सूर्य उत्तरायणात जाण्याची वाट पाहत होते.
महाभारतयुद्धात भीष्म यांच्याकडे कौरवांच्या सेनेचं सेनापतीपद होतं तोपर्यंत पांडवांना पितामहांना पराभूत करता आलं नाही, कारण ते सतत पांडवांचे वार परतवून लावत होते. भीष्म असताना पांडव जिंकणं अशक्य आहे हे खुद्द भगवान श्रीकृष्ण जाणून होते. त्याचमुळे ते युद्धसमाप्तीनंतर एक दिवस पांडवांसह पितामहांपाशी गेले आणि त्यांनाच पराभवासाठीचा मार्ग सांगण्याची विनंती केली.
पितामहांच्या बोलण्यातून ते महिलांवर प्रतिवार करत नाहीत ही बाब लक्षात आली आणि इथंच पांडवांना महत्त्वाची गोष्ट उमगली. शिखंडी पुढं अर्जुनाच्या रथावर आरूढ झाले आणि त्यांना पाहताच पितामहांनी शस्त्रत्याग केला कारण ते शिखंडीला स्त्री मानत होते. कथांमध्ये उल्लेख असल्याप्रमाणं शिखंडी सर्वप्रथम स्त्री असून, त्यानंतर ते पुरुषात रुपांतरित झाले होते. याचवेळी शिखंडीला समोर ठेवत अर्जुनानं पितामहांवर वार केला. पितामह बाणांच्या शिय्येवर होते. युद्धात पहिले 9 दिवस युद्धावर कौरवांचं वर्चस्व होतं. पण, दहाव्या दिवशी मात्र भीष्मांवर वार करत पांडवांनी कौरवांना धक्का दिला आणि पुढच्याच आठ दिवसात पांडवांनी कौरवांना नमवलं, असे उल्लेख कथा, पुराणकथांमध्ये आढळतात.
(वरील माहिती पुराणकथांमधील संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)