पवारांवर काँग्रेसचा प्रतिहल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वबळाच्या भाषेला काँग्रेसनंही आक्रमक उत्तर दिलंय. स्वबळावर लढून राष्ट्रवादीला विरोधात बसायचे आहे का असा खोचक सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 1, 2013, 09:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वबळाच्या भाषेला काँग्रेसनंही आक्रमक उत्तर दिलंय. स्वबळावर लढून राष्ट्रवादीला विरोधात बसायचे आहे का असा खोचक सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस कुठे आणि राष्ट्रवादी कुठे आहे ते कळेच असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही राष्ट्रवादीनं जे राज्यात केलंय. तेच काँग्रेसनं गुजरातमध्ये केलं असल्याचं प्रत्युत्त दिलंय.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोची इथे बोलताना 2014 सालच्या निवडणुकीत काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत फेरविचार करू, असा इशाराच काँग्रेसला दिला. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला नऊ जागा आल्या होत्या. यातील पाच जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते, तर उर्वरित जागांवर काँग्रेसचे बंडखोर उभे राहिले होते. काँग्रेसच्या या दगाबाजीने शरद पवार दुखावले गेले असून आता काँग्रेससोबतच्या आघाडीचा फेरविचार करण्याची वेळ आल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.