...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई महानगरपालिकेनं आज स्थायी समितीसमोर तब्बल ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये, विकास कामांसाठी १२८७४ कोटींची तरतूद करण्यात आलीय.

Updated: Feb 3, 2016, 10:36 PM IST
...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प title=

कृष्णात पाटील, मुंबई : मुंबई महापालिकेचं इलेक्शन बजेट आज सादर करण्यात आल्यानं. वर्षभरावर येऊन ठेपलेली निवडणूक नजरेसमोर ठेवून, फारशी करवाढ न लादणारं बजेट मुंबई महापालिका प्रशासनानं आज मांडलं...  

  • मुंबई महापालिकेचं 37 हजार 52 कोटींचं बजेट

  • निवडणूक वर्ष असल्यानं फारशी करवाढ नाही

  • मात्र मुंबईत पेट्रोल आणि डिझेल महागणार

  • इथेनॉलवरचा 7 टक्के जकात कर रद्द 

मुंबई महापालिकेच्या आज सादर झालेल्या बजेटमधील या ठळक तरतुदी... या बजेटमध्ये कच्चा तेलावरील जकात कर 3 टक्क्यांवरून 4.5 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्यामुळं मुंबईत पेट्रोल आणि डिझलचे दर वाढणार आहेत. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे बुधवारी अर्थसंकल्प सादर केला.

37 हजार 52 कोटींच्या या बजेटमध्ये विकास कामांसाठी 12 हजार 874 कोटी तर आरोग्यासाठी 3 हजार 693 कोटींची तरतूद करण्यात आलीय.

  • रस्त्यांसाठी 3 हजार 863 कोटी

  • पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 998 कोटी

  • पाणीपुरवठ्यासाठी 608 कोटी 

  • उड्डाणपुलांसाठी 629 कोटी

  • अग्निशमन दलासाठी 323 कोटी 

  • बेस्ट उपक्रमासाठी 10 कोटी

  • एलईडी दिव्यांसाठी 10 कोटी

  • गलिच्छ वस्ती सुधारणा कार्यक्रमासाठी 100 कोटी

  • मागठाणे इथं थॅलेसेमिया उपचार केंद्रासाठी 5 कोटी

  • दोन रूग्णालयांमध्ये मानवी दुग्ध पेढी

  • स्मार्ट सिटीसाठी 10 कोटी

  • ईस्टर्न, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर महिलांसाठी शौचालये बांधण्यासाठी 5 कोटी

  • स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानासाठी 80 कोटी

  • डंपिंग ग्राउंडवरील कचरा प्रक्रियेसाठी 28 कोटी

  • उद्याने व मैदानांसाठी 312 कोटी

  • रात्र निवारे बांधण्यासाठी 3 कोटी

  • चौपाट्यांच्या सुशोभिकरणासाठी 20 कोटी रूपयांची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलीय.

मुंबईकरांना आता अवघ्या 15 दिवसांत जलजोडणी मिळेल, अशी आनंदवार्ता देखील या बजेटनं दिलीय. तर मुंबई बाहेरून महापालिका रूग्णालयांमध्ये येणा-या रूग्णांसाठी स्वतंत्र शुल्क आकारणीचा प्रस्तावही प्रशासनानं मांडलाय. सध्या बीएमसी रूग्णालयात 45 टक्के रूग्ण हे बाहेरचे आहेत. त्यांच्यासाठी आरोग्यसेवा महागण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईकरांवर कोणतीही नवी थेट करवाढ नसल्यानं यंदाचं हे बजेट इलेक्शन बजेट ठरलंय. 

शैक्षणिक अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत १०७ कोटींची कपात करण्यात आलीयं. एकूण २३९४ कोटींचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला... या बजेटमध्ये मुंबई महापालिका भगिनी शाळा ही नवी संकल्पना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलीये. त्याअंतर्गत नामांकित खाजगी शाळांमधले शिक्षक आठवड्यातून दोन तास महापालिका शाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. मात्र या योजनेला विरोध होण्याची शक्यता आहे.