तावडेंमागे ब्रिगेड, पंकजा एकाकी

भाजपच्या फडणवीस सरकारमधील पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे दोन मंत्री सध्या वादाच्या भोव-यात सापडलेत. मात्र दोन्ही मंत्र्यांचा बचाव करताना भाजपमधली दरी स्पष्ट जाणवतेय....

Updated: Jun 30, 2015, 09:30 PM IST
तावडेंमागे ब्रिगेड, पंकजा एकाकी  title=

देवेंद्र कोल्हटकरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : भाजपच्या फडणवीस सरकारमधील पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे दोन मंत्री सध्या वादाच्या भोव-यात सापडलेत. मात्र दोन्ही मंत्र्यांचा बचाव करताना भाजपमधली दरी स्पष्ट जाणवतेय....

शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर आरोप काय झाले, ज्येष्ठ मंत्री फायर ब्रिगेडसारखे धावून आले... शाळांसाठी अग्निशमन यंत्रांच्या खरेदीत 191 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट मंगळवारी एका इंग्रजी दैनिकानं केला. त्यामुळं अडचणीत सापडलेल्या विनोद तावडेंच्या बचावासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील एकत्र आले...

उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्याच आठवड्यात पंकजा मुंडेंच्या महिला व बालविकास खात्यातला 206 कोटींचा साहित्य खरेदी वाद गाजला होता. त्यावेळी त्या परदेशात होत्या. मंगळवारी सकाळीच त्या मायदेशी परतल्या. मात्र तावडेंसाठी ज्या पद्धतीनं मंत्री धावून आले, तसं पंकजा मुंडेंच्या बाबतीत घडलं नाही. त्यामुळं पंकूताईंनाच आपल्या कार्यकर्त्यांमार्फत शक्तिप्रदर्शन करावं लागलं.

भाजपमधली ही दुही समोर आली असताना, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी मात्र त्याचा स्पष्टपणे इन्कार केलाय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिका दौ-यावर आहेत. त्यांच्या मागे भाजपच्या मंत्र्यांमध्येच गटतट निर्माण झालेत की काय, अशी शंका घेतली जातेय. भाजपमधील ही आग कोण आणि कशी विझवणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.