मुंबई : महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातल्या एसी बसगाड्या बंद झाल्यानंतर, आता शिवसेना भाजपमधलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.
किंगलाँगच्या एसी बसगाड्या खरेदी करण्याच्या भाजपच्या अट्टहासामुळेच बेस्टचा पाय खोलात गेल्याचा आरोप, शिवसेना आमदार आणि बेस्टचे माजी अध्यक्ष संजय पोतनीस यांनी केलाय. कमी दर्जाच्या किंगलाँगच्या एसी बसेस ऐवजी व्होल्वोच्या एसी बसेस खरेदी कराव्यात, असं शिवसेनेचं म्हणणं होतं. मात्र किंगलाँग एसी बसचा हट्ट भाजपनं सोडला नव्हता असा आरोप संजय पोतनीसांनी केला.
शिवसेनेच्या बेस्ट अध्यक्षांच्या कार्यकाळात एसी बस खरेदीचा प्रस्ताव कधीही मंजूर झाला नाही. मात्र भाजपच्या बेस्ट अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत किंगलाँगच्या 250 एसी बसेस खरेदी करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
मुंबईकर प्रवाशांना बेस्ट बसकडे आकर्षित करण्यासाठी तिचा रंग बदण्याचा विचार सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील जे.जे स्कुल आँफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी लाल रंगातील बेस्टचा रंगपालट करण्यात यावा असं सुचवलं होतं. त्यानुसार जे.जे स्कुल आँफ आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावर लाल रंगातील बेस्ट बसला शुभ्र पांढ-या रंगात रंगवलंय. हा नवा लुक मुंबईकर प्रवाशांच्या किती पसंतीस उतरतोय हे पाहणं मात्र महत्वाचं आहे.
तोट्यात चालणा-या 266 एसी बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय. मात्र, आता बंद केलेल्या एसी बसचं पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. या एसी बस भंगारात द्याव्यात असा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे. या एसी बस साध्या बसमध्ये रुपांतरित करुन वापरण्याजोग्या करण्यासही मोठा खर्च येणार आहे.
तसंच या बस आणखी केवळ ४ वर्षेच चालू शकणार असल्यानं त्यांची पूनर्रखरेदी करणंही शक्य नाही. महिन्याला तब्बल 11 कोटींचा तोटा होत असल्यानं या बस बंद केल्या आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासनापुढे या एसी बस भंगारात देणे हा एकमेव पर्याय राहिला आहे.