मुंबईला देशाशी जोडणारे ३ पूल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

मुंबई ही कायमच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे. आता महानगरीला पुन्हा एकदा नवा धोका उत्पन्न झालाय. गुप्तचरांच्या हाती आलेल्या माहितीनुसार घातपाताचा हा कट पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISIच्या मदतीनं आखला असण्याची शक्यता आहे. तसे पुरावेही सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

Updated: Jul 6, 2016, 09:40 PM IST
मुंबईला देशाशी जोडणारे ३ पूल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर title=

मुंबई : मुंबई ही कायमच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे. आता महानगरीला पुन्हा एकदा नवा धोका उत्पन्न झालाय. गुप्तचरांच्या हाती आलेल्या माहितीनुसार घातपाताचा हा कट पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISIच्या मदतीनं आखला असण्याची शक्यता आहे. तसे पुरावेही सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

मुंबईला देशाशी जोडणारे 3 पूल

1.वाशीचा खाडीपूल
 
2.कल्याण-नाशिकशी जोडणारा ठाण्याचा पूल 

3. भाईंदरचा खाडी पूल

सध्या पोलिसांनी या सर्व पुलांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. पाकिस्तानात असलेल्या एका मॉड्यूलच्या फोन टॅपिंगमधून हा अतिरेकी कट सुरक्षा यंत्रणांना समजला. याची माहिती राज्याच्या गृहखात्याला देण्यात आली आहे. त्यातच अतिरेकी कट म्हणून नजरेआड होऊ शकत नाही, असं संरक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

अतिरेकी छोटे-छोटे स्फोट करून माणसं मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र एखाद्या शहराचा देशापासून संपर्क आणि सरद तोडायची, ही रणनीती लष्करी डोक्यातूनच येऊ शकते. अतिरेक्यांकडे इतके मोठे आणि मजबूत पूल उडवून देणारी साधनं, स्फोटकं नसतात. तांत्रिक पाठबळही नसतं. एखाद्या लष्कराकडे मात्र ही साधनसामुग्री आणि बुद्धीमत्ता निश्चित असते. त्यामुळेच या कटामागे ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा हात असू शकतो, असं मानलं जातंय. 

याखेरीज ही टीप खरी असू शकते, असं मानण्याचं आणखी एक कारण आहे. अतिरेक्यांनी आतापर्यंत भारतातल्या प्रत्येक कारवाईचा प्रयोग हा देशाच्या आर्थिक राजधानीतच केलाय. १९९३चे मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट ही ISIच्या मदतीनं झालेली देशातली पहिली मोठी अतिरेकी कारवाई याच स्फोटांसाठी प्रथम RDXचा वापर झाला.

इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेकी मॉड्यूलनं पहिले स्फोट मुंबईतच घडवले. अतिरेक्यांच्या स्लिपर सेलचा वापर गेल्या दशकात प्रथम मुंबईतच झाला. लास्ट बट नॉट लिस्ट,  26/11चा हल्ला... देशात 10 अतिरेकी घुसवून थेट हल्ल्याची ही देशातली पहिलीच घटना. मुंबईचं आर्थिक आणि राजकीय महत्त्व वादातीत आहे. म्हणूनच ती कायमच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे.