मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच

मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होणारच, असा ठाम दावा बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. मात्र दोन्ही पक्षांत चर्चेचं गु-हाळ सुरुच राहणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतरच आघाडीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

Updated: Nov 30, 2011, 05:52 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होणारच, असा ठाम दावा बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. मात्र दोन्ही पक्षांत चर्चेचं गु-हाळ सुरुच राहणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतरच आघाडीबाबत अंतिम निर्णय होणार आहे. तसचं जागावाटपाबाबतही या बैठकीत कोणतीची चर्चा झाली नाही. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चेचं गु-हाळ सुरुच राहणार, हे स्पष्ट झालय. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी आघाडीबाबत चर्चेची ही दुसरी फेरी पार पडली.

 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रामदास आठवलेंच्या आरपीआयने शिवसेना-भाजपासोबत युती केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी समोर मोठं आव्हान आहे. तसंच मागच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होऊ न शकल्याने शिवसेना-भाजपाने महापालिकेवरची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे मागच्या अनुभवातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतृत्वाने योग्य तो धडा घेतल्याचं दिसत आहे.  केरळ राज्या एव्हढा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. आता या तुंबळ युध्दातून मनसेची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. एकीकडे आरपीआय काँग्रेस-राष्ट्रवादीला अडचणीत आणु शकते तर दुसरीकडे मनसे सेना-भाजपाच्या मतांवर डल्ला मारू शकते. त्यामुळे महापालिकेची निवडणूक रंगतदार होईल हे मात्र नक्की.