www.24taas.com, मुंबई
सध्या मुंबईत 'मंकी मॅन'ची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की मंकी मॅन ही फक्त अफवा आहे. मंकी मॅन असा कोणीही अस्तित्वात नाही. त्यामुळे मुंबईकरांनी अजिबात घाबरु नये, असं आवाहन पोलिसांनी केलंय.
गेले काही दिवस मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये ही मंकी मॅनची अफवा पसरलीय. मंकी मॅनच्या अफवेमुळं दोघांना आपला जीवही गमवावा लागलाय. मंकी मॅनच्या अफवेमुळं कामावरुन घाईघाईनं बाईकवर घरी परतणाऱ्या एकाने ट्रकला धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत मंकी मॅनला शोधण्यासाठी निघालेल्या तरुणाचा पाय घसरुन पडल्यानं मृत्यू झाला. सुरुवातीला मुलूंड भांडूंप भागात अशी अफवा पसरली. त्यानंतर आता अंधेरी, कांदिवली भागात मंकी मॅनची अफवा पसरवली जातेय. त्यामुळे काही भागात लोक रात्रीच्या वेळी जागता पहारा देतायत. मंकी मॅनला अनेकांनी पाहिल्याचा दावा केलाय. मात्र तो नक्की कसा आहे आणि त्याचं वर्णन किंवा ठावठिकाणा सांगू शकलेले नाहीत किंवा मंकी मॅनकडून कोणावरही हल्ला करण्यात आलेला नाही.
चोर सोडून भलत्यालाच बदडण्याच्या घटना ठाण्यातही घडत आहेत. मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या अफवांनंतर धास्तावलेले लोक मग मिळेल त्या अनोळखी व्यक्तीवर राग काढत आहेत. ठाण्याच्या चरई भागात काही दिवसांपूर्वी एका कामगाराला अशीच मारहाण करण्यात आली. चोरांच्या भीतीनं जागणारा हा कामगार एका परिसरातून दुसऱ्या परिसरात गेला आणि तिथं जागरण करणाऱ्या लोकांना त्याला संशय आल्यानं चोर समजून त्यांनी त्याला मारहाण केली.
मुंबईकर मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या अफवांनी पुरते दहशतीखाली आहेत आणि त्यातूनच चोर सोडून भलत्याच लोकांना मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत.
ठाणे, मुलुंड भागात काही दिवसांपूर्वी मारहाणीच्या अशाच घटना घडल्या. दहशतीखाली असलेले नागरिक दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत आणि रात्री-रात्री जागून काढतात. अशाच वेळी कोणी अनोळखी व्यक्ती दिसली तर चोर समजून त्याला बेदम मारहाण केली जाते.
मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच काही व्यक्तींना मारझोड करण्यात आली. चड्डीवर असलेल्या कामगाराला चड़्डी-बनियान टोळीचा सदस्य समजून नागरिकांनी बेदम मारलं, पण नंतर तो सामान्य कामगार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे अनोळखी व्यक्ती एखाद्या परिसरात दिसली तर तिथले नागरिक संशयग्रस्त नजरेनं पाहतात, आणि त्यातच संशय वाढला तर बेदम मारहाण करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे अनेकदा निष्पांपांना या अफवेतून रोषाचे बळी ठरावं लागतंय.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगणं गरजेचं बनलं आहे, तसंच संशयास्पद व्यक्ती दिसली तर तिला पकडून पोलिसांकडे देणं हाच योग्य पर्याय ठरू शकतो.