कसाबला फाशी ऐवजी जन्मठेप हवी

२६ / ११ च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्या वकिलाने सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी फाशी न देता जन्मठेपच द्या अशी विनंती कोर्टापुढे केली. कसाबच्या फाशीवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात खटला सुरू असून राजू रामचंद्रन यांना कसाबची बाजू मांडण्यास सांगितलं.

Updated: Feb 14, 2012, 04:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

२६ / ११ च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्या वकिलाने सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी फाशी न देता जन्मठेपच द्या अशी विनंती कोर्टापुढे केली. कसाबच्या फाशीवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात खटला सुरू असून राजू रामचंद्रन यांना कसाबची बाजू मांडण्यास सांगितलं. आपल्या युक्तिवादात रामचंद्रन म्हणाले, की त्याच्या फाशीवर निर्णय देताना त्याला जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा विचार होऊ नये.

कसाबने ज्यावेळी मुंबईवर हल्ला केला तेव्हा तो वयाने कमी होता आणि त्याला धार्मिक विद्वेषाने भडकवण्यात आले होते. या हल्ल्याचे सूत्रधार अन्य असून, त्यांना शिक्षा होणे शक्य नाही. त्यांनी कसाबला चुकीचे शिक्षण देऊन या हल्ल्यासाठी उद्युक्त केले होते. त्यामुळे त्याच्या मागणीनुसार त्याला फाशी न देता, जन्मठेप द्यावी, असे रामचंद्रन यांनी कोर्टाला सांगितले.

मुंबईवर केलेल्या भयानक हल्ल्याबद्दल कसाबला मे २०१० मध्येच ऑर्थर रोड येथील विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये त्यावर हायकोर्टातही शिक्कामोर्तब झाले असून, आता हा खटला सुप्रीम कोर्टापुढे सुनावणीसाठी आला आहे.