देशातील बरेचसे तरुण जेल भरो करण्यासाठी तयार आहेत. परंतु लोकसभेत काल लोकपाल विधेयकाला घटनात्मक मंजुरी मिळाली नाही. तसेच आता राज्यसभेतही संसदेतील कुठल्याही पक्षात सहमती होत नाही. त्यामुळे आता जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही. त्यामुळे जेलभरो आंदोलनाऐवजी आता मतदार जागृती अभियान पाच राज्यात राबविण्यात येणार आहे असल्याचे अण्णांनी जाहीर केले. तसेच दोन वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणुकांमध्येही मतदार जागृती अभियान राबविणार असल्याचेही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.
संसदेतील विदारक चित्र पाहून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीन दिवस चालणारे उपोषण दोन दिवसांतच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते.
काल संसदेत लोकपाल विधेयकावर चर्चा झाली. त्या चर्चेवर अण्णा यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारची भ्रष्टाचार नष्ट करण्याची इच्छा नाही. बहुमताच्या जोरावर पक्ष एकत्र येऊन हुकुमशाही मार्गाने विधयेक संमत करतात. ही लोकशाही की हुकूमशाही असा सवाल अण्णांनी व्यक्त केला.
सध्या उपोषण जरी सोडणार असलो तरी पाच राज्यात जाऊन लोकांचे जन जागरण करणार आहेत. तसेच भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचे आणि भ्रष्ट लोकांना मतदान न करण्याचे आवाहन करणार असल्याचे अण्णांनी या वेळी सांगितले.
मुंबईतील उपोषण सोडणार असले तरी ३० डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करणार असल्याचेही अण्णांनी स्पष्ट केले.