पुण्याच्या विनीलचा धाडसी, साहसी आणि विक्रमी प्रवास!

ताशी 140 ते 150 किलोमीटर असा सुसाट वेग आणि चोवीस तासात 2,137 किलोमीटरचा विक्रमी प्रवास… तोही बाईकवर... ही किमया केलीय पिंपरी चिंचवडमधील बायकर विनील खारगे या तीस वर्षीय तरुणाने...

Updated: Feb 4, 2015, 11:12 AM IST
पुण्याच्या विनीलचा धाडसी, साहसी आणि विक्रमी प्रवास! title=
प्रातिनिधिक फोटो

पुणे : ताशी 140 ते 150 किलोमीटर असा सुसाट वेग आणि चोवीस तासात 2,137 किलोमीटरचा विक्रमी प्रवास… तोही बाईकवर... ही किमया केलीय पिंपरी चिंचवडमधील बायकर विनील खारगे या तीस वर्षीय तरुणाने...

विनील खारगे... पिंपरी चिंचवडमध्ये एका कम्यूटर कंपनीत काम करणारा एक तरुण... विनीलने अवघ्या चोवीस तासात पुणे ते चेन्नईतील वेलोरे आणि पुन्हा पुणे असा 2,137 किलोमीटरचा विक्रमी प्रवास पूर्ण केलाय. या प्रवासा दरम्यान केवळ पेट्रोल भरण्यासाठी तो थांबला. दोन ठिकाणी टोल नाक्यावर त्याची गाडी रोखली होती. त्याचं बिल आणि पंपाचं काढलेलं छायाचित्र त्यानं पुरावा म्हणून बाळगलेत. दुचाकीवरुन कमी कालावधीत सर्वाधिक अंतर कापण्याचा हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. 

शुक्रवारी 30 जानेवारीला दुपारी 3 ला त्यान ताथवडे, चिंचवड मधून बाईक 'स्टार्ट' केली. कर्नाटक, हुबळी, बंगळूरु या मार्गे चेन्नईतील वेल्लोरे येथे पोहचला. हे 1,068 किलोमीटरचे अर्धे अंतर त्यानं पार केले. तेथे तो शुक्रवारी रात्री 3.25ला पोहचला. तेथून पुन्हा पुण्याचा दिशेन प्रवास सुरू झाला. पुन्हा याच मार्गान बाईक सुसाट पळवित तो शनिवारी 31 तारखेला दुपारी 2 वाजून 53 मिनिटांनी परत पुण्यात पोहचला. त्यानंतर 15 मिनिटांनी म्हणजे 3 वाजून 8 मिनिटांनी चिंचवडच्या प्रारंभस्थळावर तो होता. यापूर्वीही त्यानं बाईकवरुन 36 तासांमध्ये अडीच हजार किलोमीटर कापण्याचा विक्रम नोंदवलाय. 

हा विक्रम करताना त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. बाईक सलग वेगाने चालवल्याने टायर गरम होऊन टायर फुटून अपघात होण्याचा धोका असतो. विनिलन टायरमध्ये नायट्रोजन वायू भरुन घेतला होता. त्यामुळे टायर लवकर गरम होत नसल्यान वेग कायम राखण्यास त्याला मदत झाली.

कमी कालावधीत सर्वाधिक अंतर कापण्याच्या विनीलच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक इंडिया, आशिया रेकॉर्ड आणि रेकॉर्ड होल्डर रिपब्लिकन या संस्थेकड केली जाणार आहे. या संस्थांच्या पूर्वपरवानगीने त्याने या विक्रमाचा ध्यास घेतला आणि तो पूर्ण करुन दाखविला. त्याच्या या जिद्दीला झी मीडियाचा सलाम…!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.