सोलापूर : जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे, शिवतारे म्हणाले, "राज्य शासनाने चारा छावण्या बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाशी शिवसेना सहमत नाही, हा निर्णय कोणत्या वेड्याने घेतला".
शिवतारे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगावात बोलत होते, ते जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी येथे आले होते. एका बाजूस चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयावर टीका करताना जलयुक्त शिवार योजनेच्या शासनाच्या कामाचे शिवतारे यांनी जोरदार समर्थन केले.
'सरकारमध्ये असताना शिवसेना शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील निर्णयाचे समर्थन अजिबात करणार नाही. जे चुकीचे असेल त्याला आमचा विरोध राहील', असेही त्यांनी यावेळी शेतकरी मेळाव्यात बोलतांना सांगितले.
शिवतारे यांचा रोख भाजप नेत्यांवर होता. सध्याची दुष्काळी परिस्थिती ही १९७२च्या दुष्काळापेक्षाही भीषण आहे. अशा वेळी शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणे अपेक्षित असताना चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशा शब्दांत शिवतारे यांनी या वेळी टीका केली.