`राज` आदेशानंतर राज्यभरात `टोल`फोड!

राज्यात पुन्हा एकदा टोलवरुन वातावरण तापलंय. टोल भरु नका असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते टोलविरोधात रस्त्यावर उतरलेत... राज्यात विविध ठिकाणी टोलनाक्यांवर तोडफोड झालीय...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 27, 2014, 08:35 AM IST

www.24taas.com, झी मीडिया , नवी मुंबई
राज्यात पुन्हा एकदा टोलवरुन वातावरण तापलंय. टोल भरु नका असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते टोलविरोधात रस्त्यावर उतरलेत... राज्यात विविध ठिकाणी टोलनाक्यांवर तोडफोड झालीय...
नवी मुंबईत ऐरोली, मुलुंडचा आनंदनगर आणि ठाण्याचा घोडबंदर रोड या टोलनाक्यांना मनसे कार्यकर्त्यांनी लक्ष केलं. रात्री दीडच्या सुमारास दहिसरमध्येही टोलनाक्याची तोडफोड करण्यात आलीय. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याच्या चांदणी चौक, पौड रोड, औरंगाबादचा करमाड रोड आणि नागपूरच्या हिंगणा टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलीय.
गेल्या काही दिवसांत कोल्हापूर आणि सांगलीत टोलविरोधी आंदोलन सुरुच होतं.. टोलविरोधी आंदोलन शांत झाले असं वाटत असतानाच पुन्हा एकदा हे आंदोलन पेटलंय. याला निमित्त ठरलंय नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलविरोधी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर. टोल नाक्यावर टोल भरू नका, कोणी आडवे आले तर फोडून काढा असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.
टोलफोडीचं हे सत्र मुंबई ठाण्यातून पुणे, नागपूर आणि औरंगाबादपर्यंत पोहचलं. मनसे कार्यकर्त्यांनी टोलविरोधात संताप व्यक्त करत टोलनाक्यांना लक्ष्य केलं. एकूणच काय टोलविरोधी मनसेनं पुकारलेलं युद्ध पेटण्याची चिन्हं आहेत. टोलविरोधी जनभावना लक्षात घेऊन टोल न भरण्याचा मुद्दा जरी योग्य असला तरी अशी तोडफो़ड आणि हिंसा नक्कीच समर्थनीय नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.