चंद्रपूर : विदर्भाची ओळख व्याघ्रपंढरी अशीही आहे. देशामध्ये सर्वाधिक पट्टेदार वाघ विदर्भात आहेत. या वाघांना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक, विदर्भातल्या जंगलात येत असतात.
या सर्वांची एकच इच्छा असते ती म्हणजे, जंगल भ्रमंतीत जंगलाच्या या पट्टेदार राजाचं एकदा तरी ओझरतं का होईना पण दर्शन जरुर व्हावं. जंगलात भटकंतीसाठी आलेल्या प्रत्येकाच्याच वाट्याला हा दुर्मिळ योग येतोच असं नाही. मात्र उमरेड-करांडला या वन्यजीव अभयारण्यात गेलेल्या सौम्या मोहंती या चंद्रपूरकर तरुणाला, हा अनोखा अनुभव डोळेभरुन पाहता आला.
एक जानेवारीला मोहंती मित्रांसह व्याघ्रदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी अवचित रुबाबदार देखणे २ पट्टेदार वाघ, आपल्या शाही डौलात त्यांच्या गाडीकडेच आले. आणि त्यांनी त्या गाडीभोवती चक्करही मारली. त्यातल्या एकानं स्वतःचीच छबी जिप्सीच्या आरशात न्याहाळली. काही काळ दोन्ही वाघ तिथेच थांबले.
मोहंती यांच्यापासून अगदी काही इंचावर असलेल्या या वाघांना न्याहाळताना, सौम्या मोहंती आणि त्यांच्या मित्रांचा श्वास रोखला गेला होता. त्यातच प्रसंगावधान राखून त्यांनी हा सारा अनुभव कॅमेरात कैद केला.