डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत आज मतदानाच्या दिवशी भाजप - मनसे कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनर्थ टाळला.
डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली या वॉर्ड क्रमांक ७४ मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यावर तलवार हल्ला करण्यात आला. भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चार वाजण्याच्या सुमारास जोरदार धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून चाकू, चॉपर,तलवारीचा वापर करण्यात आला.
यावेळी भाजप कार्यकर्ता नितीन पालन याच्यावर तलवार हल्ला करण्यात आला. परंतु त्याने तलवार हाताने रोखल्याने त्याच्या हातावर मोठी जखम झाली. हा हल्ला मनसेच्या उमेदवार मंदाताई पाटील यांचे पती सुभाष पाटील यांनी केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
दरम्यान, पोलिसांनी लाठीमार करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पळवून लावल्याने मोठा अनर्थ टळला. आज मतदान शांततेत झाले असले तरी या घटनेने गालबोट लागलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.