नाशिक: नाशिकमध्ये मनसेच्या वीज कामगार सेनेच्या अधिवेशन उद्घाटनाप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. भाषणादरम्यान राज ठाकरेंनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री फडणवीस हे मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात असं वक्तव्य केलं.
महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला असून याच्याशी राज्यातील सत्ताधाऱ्यांना काही घेणं देणं नाही,असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. अमित शहांनी ऊठ म्हटलं की ते उठतात, निघा म्हटलं की ते निघतात अशा तिखट शब्दात राज ठाकरेंनी फडवणीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांपासून महाराष्ट्राला मुक्त करा, असं नरेंद्र मोदी सांगायचे. आता तेच मोदी शऱद पवारांसोबत बसतात, त्यांचं कौतुक करतात याकडे लक्ष वेधत ठाकरेंनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. नाशिकमध्ये आम्ही राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेतला होता त्यावेळी आमच्यावर टीका झाली अशी आठवणही त्यांनी करुन दिली. राज्यात उद्योगधंदे कायम राहावे यासाठी कामगार संघटनांनी विनाकारण संप करु नये आणि मालकांनाही त्रास देऊ नये, असं आवाहन ठाकरेंनी केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.