क्लासच्या चुकीमुळे बारावीचे ३२ विद्यार्थ्यी परीक्षेला मुकले

एका खासगी क्लासच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर हुकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय. केवळ चुकीच्या वेळापत्रकामुळे ३० ते ३२ विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला मुकावं लागलंय.

Updated: Mar 11, 2016, 11:31 AM IST
क्लासच्या चुकीमुळे बारावीचे ३२ विद्यार्थ्यी परीक्षेला मुकले title=

पुणे : एका खासगी क्लासच्या चुकीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर हुकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय. केवळ चुकीच्या वेळापत्रकामुळे ३० ते ३२ विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला मुकावं लागलंय.

दरम्यान, या विद्यार्थ्यांना तात्काळ पुन्हा परीक्षेची संधी मिळावी तसंच संबंधितांवर कारवाई, व्हावी अशी मागणी करण्यात येतेय.  सध्या खासगी क्लासची जोरदार चलती आहे. मात्र, क्लासच्या एका चुकीमुळे जवळपास ३२ विद्यार्थ्यांचे वर्ष, वेळ आणि पैसा वाया जाणार आहे.

हतबलता आणि संताप असं पुण्यातील ठिकाणचं चित्र आहे. एका चुकीच्या वेळापत्रकाने विद्यार्थ्यांचा घात केलाय. शेवटच्या म्हणजे बुधवारचा पेपर सुरळीत पार पडला असता तर एव्हाना हे विद्यार्थी बारावीच्या दिव्यातून सुटले असते. येरवड्यातल्या सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. 

परिसरातल्या भुजबळ कॉम्प्युटर क्लासेसकडून काही दिवसांपूर्वी त्यांना बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक वाटण्यात आलं होतं. त्यामध्ये भुगोलाचा पेपर दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार असं छापण्यात आलं होतं. त्यानुसार हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले असता भुगालाचा पेपर ११ ला होता आणि २ ला संपला असल्याचं त्यांना कळलं. 

वेळापत्रकाच्या नावाखाली करण्यात आलेल्या या जाहिरातबाजीमध्ये शाळादेखील सहभागी असल्याचा आरोप विद्यार्थी तसेच पालकांनी केलाय. चुकीचं वेळापत्रक शाळेतील शिक्षकांनीच वाटल्याचा त्यांचा दावा आहे. शाळेने मात्र ही विद्यार्थ्यांचीच चूक असल्याचं सांगत हात वर केले आहेत. 

चुकीचं वेळापत्रक वाटणारा क्लास चालक क्लास बंद करून पसार आहे. पेपर मिस झालेल्या विद्यार्थ्यांसमोर जुलैमध्ये होणारी पुनर्परीक्षा हा एकमेव पर्याय आहे. असं असलं  तरी त्यांचा या परीक्षेचा निकाल नापास म्हणून येणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय.