अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: राज्यात पाणीप्रश्न सुटल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतांनाच त्यांच्याच शहरात पाण्यावरून एकाची हत्या झालीय. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलाय.
आपल्या घरासमोर भरलेल्या पाण्याच्या ड्रममधून पाणी घेतल्यानं एका 27 वर्षाच्या तरुणाची त्याच परिसरात राहणाऱ्या दोघांनी हत्या केलीय. नागपूरच्या राधा-रमण कॉलनीजवळ असलेल्या श्रीयश नगर परिसरात रक्ताचा सडा पडलेला दिसला. यावरून हल्ला किती तीव्र होता याची कल्पना येते.
आणखी वाचा - एका शाळेत ट्रॅक्टर घुसले
एका सराफा दुकानात काम करणाऱ्या 27 वर्षीय लक्ष्मण ढोमणे यानं त्याच्या घराजवळच असलेल्या शेंडे कुटुंबियांच्या ड्रममधून पाणी घेतलं. त्यावरून गोवर्धन उर्फ बाल्या शेंडे याचा आणि लक्ष्मण ढोमणेचा वाद झाला, वाद इतका विकोपाला गेला की, बाल्या शेंडेनं धारदार शस्त्रानं वार करून ढोमणेची हत्या केली. या हत्येत मधुकर तितरमारे यानं शेंडेला मदत केली. यापूर्वीही शेंडे आणि ढोमणेमध्ये पाण्यावरून वाद झाला होता.
हुडकेश्वर रोड परिसरातील हा भाग नागरी समस्यांच्या विळख्यात अडकलाय. इथं टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो तो ही दर 5-6 दिवसांनी. त्यामुळं इथल्या नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावं लागतंय. नागपूर महानगर पालिका या परिसरातील पाणी समस्या दूर करण्यात सपशेल अपयशी ठरलीय. त्यामुळं इथं सतत पाण्यावरून वाद होत असतात आणि याच वादाचं रुपांतर हत्येत झालं.
आणखी वाचा - नागपुरात पत्नीने केली पतीची हत्या, पुरले घरात
दरम्यान, हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.