माळीण: माळीण गावातील दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळं झाली असल्याची माहिती भू-वैज्ञानिक सर्वेक्षणचे महासंचालक हर्भनसिंग यांनी दिलीय. तीव्र उतार, दमदार पाऊस आणि भू-रचनेमुळं ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय.
शनिवारी भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे पथक माळीण गावी गेलं होतं. या घटनेचा सखोल अभ्यास करुनच केंद्राला 15 दिवसांत अहवाल पाठवणार असल्याचं हर्भनसिंग यांनी सांगितलंय.
नासानं वेबसाईटवर या घटनेची माहिती दिली होती. मात्र त्यांनी या परिसरातील ३० किलोमीटरमध्ये होऊ शकते असं सांगितलं होतं. ते ठिकाण सांगितलं नसल्याचं हर्भनसिंग यांनी म्हटलंय.
दरम्यान, नासानं प्रलयाच्या एक दिवस आधीच सतर्कतेचा इशारा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नासाच्या वेबसाईटवर भीमाशंकरचा संपूर्ण परिसर जांभळ्या रंगात दाखवण्यात आला होता. हा मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा जांभळ्या रंगात दर्शवण्यात आला होता. 175 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्यास जांभळा कोड दर्शवण्यात येतो. मात्र या अलर्टकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं.
विशेष म्हणजे याचसोबत भीमाशंकरसह गुजरातपर्यंतच्या संपूर्ण सह्याद्री परिसरात भूस्खलनाचा धोका असल्याचाही अलर्ट देण्यात आला होता. मात्र भारतीय हवामान विभागानं याकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याचं उघड झालं आहे. अलर्ट पाहण्याची जबाबदारी दिल्लीतील हवामान खात्याची असल्याचं सांगत टोलवाटोलवी पुणे वेधशाळेने केली. तर दिल्ली आयएमडीने हात झटकत जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे बोट दाखवलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.