मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आणखी आठ विशेष तात्काळ फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या वाढतच असून, गर्दीमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या फेऱ्या आहेत.
प्रतीक्षा यादी वाढतच चालल्याने विशेष तात्काळ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांचे हाल कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या विशेष तात्काळ फे-या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान असतील. या गाडयांना जिल्ह्यातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणात जाणा-या व कोकणातून मुंबईत परतणा-या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.
सामान्य गाडयांच्या दरांच्या तुलनेत १०० ते २९२ रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
तात्काळ गाडयांसाठी १७ मेपासून आरक्षण खुले
या गाडयांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, आणि करमाळी या स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत. या तात्काळ गाडयांचे आरक्षण १७ मेपासून खुले करण्यात येणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून ०१००५/०१००६ ही गाडी २३ आणि ३० मे रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता रवाना होऊन मडगाव स्थानकात सकाळी ११.३० वाजता दाखल होईल.
परतीच्या प्रवासा दरम्यान मडगाव स्थानकातून दुपारी १२.३० वाजता रवाना होऊन रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात दाखल होईल.
तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान ०१०४५/०१०४६ या गाडीच्या २४ आणि ३१ मे रोजी चार फे-या चालवण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी ही गाडी रवाना होऊन मडगाव स्थानकात दुपारी १२.३० वाजता दाखल होईल.
परतीच्या प्रवासासाठी मडगाव स्थानकातून सायंकाळी ४ वाजता रवाना होऊन लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात दुस-या दिवशी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी दाखल होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.