'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार?

१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे. 

Updated: Jun 8, 2016, 12:51 PM IST
'उडता पंजाब'ला ८९ कट; 'सेन्सॉर'विरुद्ध निर्माते कोर्टात जाणार? title=

मुंबई : १७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले गेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजगी दर्शविली आहे. 

'तानाशाह निहलानी उत्तर कोरियात राहतात'

उडता पंजाब सिनेमावरुन वाद आता शिगेला पोहोचला आहे. या सिनेमाचा निर्माता अनुराग कश्यपने सेंसर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानींना तानाशाह म्हटलं आहे. मला तर वाटतं की निहलानी उत्तर कोरियामध्ये राहतात, असंही अनुरागने म्हटलं आहे.

सिनेमा सेन्सॉरकडे... 

सिनेमातून पंजाबचं नाव वगळावं तसेच पंजाबचा बॅकड्रॉप काढावा, अशी सूचना सेन्सॉर बॉर्डानं केली आहे. तसेच सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यही वगळण्यास सेन्सॉर बॉर्डानं सांगितलं आहे. तब्बल ८९ कट्स सेन्सॉरने या सिनेमात सूचविले आहेत. हा सिनेमा सर्टिफिकेशनसाठी सेन्सॉरकडे पाठवण्यात आला असून अद्याप त्याला सर्टिफिकेट मिळालेलं नाही.

निर्माता कोर्टात जाणार?

सेन्सॉर बोर्डाने केलेल्या या सूचना पहाता या सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी उडता पंजाबचा निर्माता कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिनेमातील कलाकार आणि निर्मात्यांनी सेन्सॉरच्या या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

कलाकाराचं मत काय?

'उडता पंजाब सिनेमात वास्तव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सेन्सॉरचा निर्णय खरंच धक्कादायक आहे. करण जौहरनं 'उडता पंजाब'मधून वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या सिनेमात राजकारण आणू नये. माझा उडता पंजाब सिनेमाला पाठिंबा आहे' असं मत अभिनेत्री सोहा अली खान हिनं व्यक्त केलंय. 

तर 'राज्यातील ड्रग्सच्या समस्येवर आधारित हा सिनेमा आहे..सिनेमातून केवळ वास्तव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिनेमाचा विरोध चुकीचा...' असल्याचं अभिनेता शाहिद कपूरनं म्हटलंय. 

राजकारण 

सिनेमाच्या या वादावर सूचना प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठौड यांच्या म्हणण्यानुसार, जर कोणाला सेन्सॉरच्या निर्णयावर आक्षेप आहे तर त्यांना अपिल करण्याचा अधिकार आहे. तर दुसरीकडे अकाली दलने पंजाबची बदनामी करण्याचा आरोप लावत सिनेमावर बंदीची मागणी केली आहे.

'उडता पंजाब' राज्यातील ड्रग्स समस्येवर आधारित असून १७ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रदर्शित होतो किंवा नाही तसेच सेन्सॉर आणि निर्मात्यांचा वाद कोणतं वळण घेतो? हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.