जयंती वाघधरे, मुंबई : नागेश कुकनूर म्हटलं म्हणजे हैदराबाद ब्लूज, इक्बाल, डोर यांसारखे चित्रपट डोळ्यांसमोर येतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या दिग्दर्शकानं एका भावा-बहिणीच्या नात्यावर प्रकाशझोत टाकणारा आणखी एक सिनेमा बनवला आहे... याचं नाव आहे 'धनक'
सिनेमाची कथा आहे छोटू आणि परी या भावा-बहिणीची... लहानपणापासूनच त्यांचा सांभाळ त्यांच्या काका-काकुंनी केलाय... राजस्थानमध्ये घडणाऱ्या या कथेत एकीकडे छोटूला सलमान खान आवडतो तर दुसरीकडे परीला शाहरुख खान आवडतो.
छोटू हा जन्मत: दृष्टीहीन आहे. जेव्हा परीला कळतं की छोटूचे डोळे शाहरुख खानच्या गावातील एका मोहिमेव्दारे परत मिळू शकतात तेव्हा परी छोटुला घेऊन शाहरुखला भेटण्यासाठी निघते. त्यांचा हा पूर्ण प्रवास खडतर असतो. अखेर परी शाहरुखला भेटते का? त्यानंतर काय घडतं, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे बघण्यासाठी तुम्हाला 'धनक' हा सिनेमा पहावा लागेल.
नागेशच्या इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमाची कथाही साधीसरळ आहे. सिनेमातील संवादांवर विशेष मेहनत घेण्यात आलीय. नागेशने पुन्हा एकदा राजस्थानचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद केलं आहे. सिनेमाचं कॅमेरावर्क उत्तम आहे. सिनेमात छोटूच्या रोलमध्ये कृषने सुंदर काम केलं आहे. तिथेच परीच्या रोलमध्ये हेतलनेही आपली व्यक्तिरेखा चोख पार पाडली आहेत. या दोन्ही बाल कलाकारांचा अभिनय सुंदर करतो.
सिनेमाची कथा इंटरव्हलनंतर थोडी भरकटल्यासारखी वाटते. हीच या सिनेमाची सगळ्यात कमकुवत बाजू आहे. सिनेमातील राजस्थानी ढंगातील गाणीही छान झालीय. विशेष म्हणजे 'दमा दम मस्त कलंदर' या गाण्याची जुगलबंदी मस्त जुळून आली आहे.
जर तुम्हाला हलका-फुलका आणि अर्थपूर्ण सिनेमा बघण्याची आवड असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी उत्तम ट्रीट आहे. आम्ही या सिनेमाला देतोय ३ स्टार्स...