www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानातलं कराची पुन्हा एकदा स्फोटांनी हादरलंय. तालिबान्यांनी पाक रेंजर्सच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार तर १४ जण जखमी झालेत. यापैंकी चौघांची स्थिती गंभीर असल्याचं समजतंय. या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात धूराचे लोळ हवेत पसरल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. हल्ल्यातल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानातल्या कराची शहरात गुरुवारी एका आत्मघाती हल्लेखोरानं विस्फोटकांनी भरलेला ट्रकनं पाक रेंजर्स मुख्यालयाला धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती की या स्फोटाचा आवाज शहरभर ऐकायला मिळाला. मुख्यालय भवनालादेखील या स्फोटाचा चांगलाच फटका बसलाय. या इमारतीचा एक भाग पडला तसंच इमारतीला आग लागली. जवळजवळ दीड तासानंतर ही आग विझवण्यात जवानांना यश आलं.
सिंध पोलीस प्रमुख फयाज लेघारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात मृताचे अवयवदेखील हाती लागलेत त्यावरून हा आत्मघाती हल्ला असल्याचं स्पष्ट होतंय. दरम्यान, तालिबानकडून अद्याप या आत्मघातकी हल्ल्याची कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यात आलेली नाही.. असं असलं तरी तालिबानचं कराचीत मोठं नेटवर्क असल्याचं सांगण्यात येतंय.