www.24taas.com, गुडगाव
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांने कश्मिर प्रश्नावर चांगलीच मुक्ताफळे उधळली आहेत. कश्मीरचा प्रश्न हा कॅन्सरच्या रोगाइतका भयंकर आहे, पण भारत त्यावर करत असलेला लष्कराचा वापर हा जणू डोकेदुखीवरच्या ‘डिस्प्रिन’ गोळीसारखा आहे, असे तो म्हणाला.
कश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी एक ‘रोड मॅप’ तयार करण्याची गरज आहे. त्या आधारे दोन्ही राष्ट्रांना आणि कश्मिरी जनतेला सर्वमान्य होईल असा तोडगा काढता येऊ शकतो, असा सल्ला त्याने दिला. सरकार आणि राजकीय नेते यांच्यात एकवाक्यता असावी असे सांगून इम्रान खान याने पुढील महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्यात होणार्या सामन्यांचे स्वागत केले. मात्र शत्रुत्वाचे वातावरण आणि राजकीय नेत्यांचा विरोधाचा सूर असला तर स्टेडियमला रणांगणाचे स्वरूप प्राप्त होते. त्यातून लाभ होण्याऐवजी तोटाच अधिक होतो, असेही इम्रान खान याने सांगितले.
‘पाकिस्तानात माझा पक्ष सत्तेवर आला तर मुंबईवर हल्ला करणार्यांना कठोर शिक्षा करीन’ असे इम्रानने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पाकिस्तानी भूमीचा वापर कसल्याही दहशतवादी कारवायांसाठी करू देणार नाही, असे सांगून वेळ पडल्यास दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी जिहादची हाक देईन’ असेही त्याने सांगितले.