परवेझ मुशर्रफ पुन्हा पाकिस्तानात परतणार

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ आज पुन्हा पाकिस्तानात परतणार आहेत.पाकच्या एका कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय. त्यामुळं आज सकाळी समर्थकांसह दुबईवरुन ते कराचीसाठी रवाना होतील.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 24, 2013, 10:46 AM IST

www.24taas.com,कराची
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ आज पुन्हा पाकिस्तानात परतणार आहेत.पाकच्या एका कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलाय. त्यामुळं आज सकाळी समर्थकांसह दुबईवरुन ते कराचीसाठी रवाना होतील.
तब्बल ४ वर्षानंतर ते पाकिस्तान परतणार आहेत. त्यानंतर मुशर्रफ एका मोठ्या सभेला संबोधित करणार असल्याचंही सांगण्यात येतय. या सभेत ५० हजारांच्यावर पाकिस्तानी नागरिक सहभागी होतील, अशी आशाही व्यक्त करण्यात येतेय. पाक संसद भंग केलेली असताना, आणि काळजीवाहू सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरु असताना मुशर्रफ यांच्या परतीच्या वृत्तानं पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता अधिक वाढीस लागण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात मे मध्ये निवडणुका हो घातल्या आहेत. या निवडणुकीत पार्टीसह पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्याच्या तयारीत मुशर्रफ असल्याचं मानण्यात येतय. मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणांसह अनेक प्रकरणांत पाकिस्तानमध्ये खटले सुरु आहेत. अशा स्थितीत मुशर्रफ पाकमध्ये परतल्यास त्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती.
दुसरीक़डे सार्वत्रिक निवडणुकांसाठी मायदेशात परतण्याच्या तयारीत असलेले पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना तालिबाननं विरोध दर्शवलाय... पाकमध्ये आलात तर थेट जहन्नममध्ये पाठवू अशी धमकी तालिबाननं दिलीय. पाकमधल्या तालिबानी अतिरेक्यांनी एका व्हिडीओद्वारे ही धमकी दिलीय. मुशर्रफ यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या अदनान रशीद या अतिरेक्याच्या आवाजातला ही व्हिडीओ आहे.

मुशर्रफ यांची हत्या करण्यासाठी अतिरेक्यांनी विशेष पथक तयार केलंय. त्यात आत्मघातकी बॉम्बर्स, शार्पशूटर आणि जवळून हल्ला करु शकणा-या विशेष हल्लेखोराचाही समावेश असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिलीय. परवेज मुशर्रफ राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी पाकमधल्या तालिबानी अतिरेकी आणि इतर संघटनांविरोधात कारवाईची धडक मोहिम उभारली होती.
या कारवाईचा बदला घेण्यासाठीच तालिबान्यांनी ही धमकी दिल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे अशा धमक्यांना जुमानत नसल्याचं सांगत मुशर्रफ यांनी पाकमध्ये परतणारच अशी गर्जना केलीय.