www.24taas.com, झी मीडिया, लाहोर
भारतात सध्या आसाराम बापूंसारख्या स्वयंघोषित आध्यात्मिक संतांना जेलची हवा खावी लागत आहे, त्याच्याउलट पाकिस्तानात एका महिलेला स्वतःला पैगंबर म्हटल्याबद्दल अटक करण्यात आलं आहे. स्वतःला पैगंबर घोषित करून तिने ईश्वराचा अपमान केल्याचा गुन्हा केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
'पीटीआय'ने दिलेल्या बातमीनुसार गुलबर्ग येथे राहाणाऱ्या सलमा फातिमाने सोमवारी अल्लाची निंदा करणारी पत्रकं वाटली. या महिलेने स्वतःला इस्लामची संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर घोषित केलं. अशा प्रकारे स्वतःला पैगंबर म्हणणं हा अल्लाचा अपमान असल्याचं मानलं जातं.
या घटनेबद्दल तिच्या घरावर अनेक कट्टर मुस्लिमांनी हल्लाबोल केला. त्या महिलेला काही अपाय होण्याच्या आत पोलीसांनी तिला अटक केली. स्वतःला पैगंबर म्हणवणाऱ्या फातिमाकडे लोक अनेक समस्या घेऊन येत. आणि फातिमा गंडे-दोरे देऊन अडचणी सोडवण्याचा दावा करत असे.
एका स्थानिक धार्मिक नेत्याने फातिमाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. स्वतःला ईश्वर म्हणवणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अटक केलं आहे. तिला कोर्टात हजर करून तिच्यावर पुढी कारवाई करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.