शेवटची इच्छा सांगितली आणि फाशीच्या शिक्षेला स्थगिती

फाशीची वेळ आली होती, पण ऐनवेळेस असा काही निर्णय आला की, त्याला फाशीवर जाण्यासाठी काही मिनिटं असतांना, त्याची फाशी रद्द करण्यात आली.

Updated: Mar 19, 2015, 08:31 PM IST
शेवटची इच्छा सांगितली आणि फाशीच्या शिक्षेला स्थगिती title=

इस्लामाबाद : फाशीची वेळ आली होती, पण ऐनवेळेस असा काही निर्णय आला की, त्याला फाशीवर जाण्यासाठी काही मिनिटं असतांना, त्याची फाशी रद्द करण्यात आली.

लहान मुलाच्या हत्येप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, सरकारकडून हिरवा कंदील येताच तुरुंगप्रशासनाने त्याला शिक्षा देण्याची तयारी सुरु केली, त्याला पांढरे कपडे देण्यात, फाशीच्या तख्तापर्यंत तो पोहोचलाही होता, शेवटची इच्छा विचारण्यात आली पण तोपर्यंत ऐनवेळी त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आणि तो वाचला.

चित्रपटातील कथानकाप्रमाणे हा प्रसंग घडला पाकिस्तानमध्ये. पेशावर शाळेतील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने फाशीच्या शिक्षेवरील बंदी मागे घेतली आहे. यानिर्णयानंतर पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याचा सपाटा सुरु आहे. 

इस्लामाबादमधील लहान मुलाच्या हत्येप्रकरणी शफाकत या तरुणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. २००४ मध्ये ही हत्या झाली होती आणि त्यावेळी  शफाकत अवघ्या १४ वर्षांचा होता. हत्येप्रकरणी अटक झाली तेव्हा देखील शफाकत  निर्दोष असल्याचे सांगत होता. पण  पोलिसांनी त्याच्यावर अमानूष अत्याचार केले. 

गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला सिगारेटचे चटकेही देण्यात आले होते. शफाकतच्या आईवडिलांसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कासाठी लढणाऱ्या संस्थांनीही शफाकतला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता. मात्र पाकिस्तानमधील न्यायालयाने शफाकतला दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. 

पाकिस्तान सरकारने फाशीवरील बंदी हटवल्यावर बुधवारी शफाकतला फाशीची शिक्षा दिली जाणार होती. शफाकतच्या वतीने त्याच्या वकिलांनी दयेचा अर्ज दिला होता. मात्र तो मंजूर झाला नव्हता. बुधवारी सकाळी शफाकतचा भाऊ जमान तुरुंगात गेला. शफाकतची फाशीची तयारीही पूर्ण झाली, त्याला अंतिम इच्छाही विचारण्यात आली. 

शफाकतला फाशी देण्यासाठी काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना त्याचा दयेचा अर्ज मंजूर झाल्याचे वृत्त तुरुंग प्रशासनाच्या कानावर आले आणि त्याची फाशी थांबवण्यात आली. पाक सरकारने शफाकतचा अर्ज मंजूर करुन त्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.  गुन्हा घडला त्यावेळी शफाकत अल्पवयीन होता, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही असे स्थानिक समाजसेवी संस्थांनी न्यायालयात सांगितलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.