यांगून : म्यानमार देशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाने बाजी मारली आहे. त्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या देशात सू की यांचे सरकार येणे ही अटळ बाब ठरली आहे.
म्यानमारचे अध्यक्ष थिन सेन यांनी यासंदर्भात लिहिलेले एक पत्र माहितीमंत्री ये हुतूत यांनी आँग सॅन सू की यांना दिलेय. जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करीत सत्ता हस्तांतरण केले जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी या पत्रात दिले आहे.
आँग सॅन सू की यांचे अभिनंदन
म्यानमारमधील निवडणुकीत मोठे यश मिळविल्यानंतर येथील लोकशाहीसमर्थक नेत्या आँग सॅन सू की यांनी देशाचे अध्यक्ष आणि शक्तिशाली लष्कर यांच्याशी राष्ट्रीय मनोमिलनाचे आवाहन केले होते. म्यानमारमध्ये लोकशाही रुजण्यास प्रयत्न करणाऱ्या आँग सॅन सू की यांचे अध्यक्षांनी अभिनंदन केले आहे.
यापूर्वी १९९० मध्येही सू की यांच्या पक्षानेच विजय मिळविला होता. मात्र, त्यावेळी लष्कराने तो निकाल मान्य केला नव्हता. आताही तसेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना आता सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन सरकारने दिलेय. त्यामुळे आँग सॅन सू की यांना मोठे यश आले आहे.
सत्तेत लष्करालाच महत्व
नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाला संसदेतील कनिष्ठ सभागृहातील आतापर्यंत घोषित निकालांपैकी ९० टक्के जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला विजयी घोषित केलेले नाही. मात्र, जाहीर झालेले निकाल पाहता सू की यांची राजवट अटळ आहे. या देशात गेल्या ५० वर्षांपासून लष्कर किंवा त्यांच्या सहकारी पक्षांची सत्ता राहिलेली आहे. लष्कराचे २५ आणि राजकीय पक्षाचे ७५ टक्के प्रतिनिधी सरकारमध्ये असतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.