मुंबई : सोमवारच्या सूर्योदयासोबत जागे होताना संपूर्ण जग 'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्याने हादरले. जगभरातील सर्वच देशांच्या माध्यमांत आज या 'पनामा पेपर्स'ची चर्चा आहे. भारतात या घोटाळ्यामुळे बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तिमत्व अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, तर उद्योगपती गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी, डीएलएफचे मालक के पी सिंग, मृत डॉन इक्बाल मिर्ची ही नावं चर्चेत आली आहेत.
काय आहे मोझॅक फोन्सेका?
पनामा या देशाला करचुकव्यांचा स्वर्ग असं म्हटलं जातं. याच देशातील एक कायदेशीर कंपनी मोझॅक फोन्सेका ही खोट्या कंपन्यांच्या मार्फत विविध लोकांना त्यांचे पैसे या कंपन्यांमध्ये गुंतवायला मदत करते. हे करताना गोपनीयतेची सर्वात मोठी हमी दिली जाते.
खरं तर परदेशात पैसे गुंतवणं बेकायदेशीर नाही. मात्र, प्रत्येक देशात कर भरण्यासाठी किंवा परदेशात पैसा गुंतवण्यासाठी काही नियम आणि अटी असतात. त्या मोडून परदेशात पैसा गुंतवून तो वाढवण्याचे उद्योग या कंपनीतर्फे केले जातात.
काय आहेत 'पनामा पेपर्स'?
जगभरातील ७८ देशांतील वृत्तसमूहांच्या एका गटाने एकत्र येऊन या कंपनीचा डाटा उघड करण्याचा घाट घातला. यात त्यांच्या हाती २.६ टेराबाईट इतका प्रचंड गोपनीय कागदपत्रांचा साठा हाती लागला. भारतातील 'द इंडियन एक्सप्रेस' या वृत्तपत्रातील पत्रकारांच्या एका गटाचा यात समावेश होता. गेले आठ महिने हे पत्रकार या सर्व कागदपत्रांचे वाचन करत होते. तब्बल १ कोटी १० लाख पानांचे वाचन करण्यात आले. कोणी, कोणाच्या नावे आणि कोणत्या कंपनीत पैसा गुंतवला आहे याची माहिती यातून पुढे आली. हे सर्व काम अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आले.
जगभरातील शोधपत्रकारितेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे मानले जात आहे. या सर्व सामील माध्यमांनी एकाच वेळी म्हणजे (भारतातील रविवारी रात्री उशीरा) या कागदपत्रांची जाहीर वाच्यता केली आणि अनेक बड्या हस्तींची नावं उजेडात आणली.
Biggest leak in the history of data journalism just went live, and it's about corruption. https://t.co/dYNjD6eIeZ pic.twitter.com/638aIu8oSU
— Edward Snowden (@Snowden) April 3, 2016
कोणाकोणाची नावं यात आहेत?
जगभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावं यात आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पोरोशेन्को, ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांचे वडील, इजिप्तचे माजी हुकुमशाह होस्नी मुबारक, लिबियाचे मृत हुकुमशाह मोहम्मद गद्दाफी, सिरीयाचे बशर अल असाद, सौदीचे राजे, पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान नवाझ शरीफ, माजी दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो, खेळाडू लिओनेल मेस्सी यांच्या नावाचा समावेश आहे. या इतक्या मोठ्या नावांमुळेच जग हादरले आहे.
भारतातील कोणाची नावं आहेत?
भारतातील ५०० व्यक्तींची नावं या यादीत आहेत, अशी माहिती मिळत आहे. बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तिमत्व अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, तर उद्योगपती गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी, डीएलएफचे मालक के पी सिंग, मृत डॉन इक्बाल मिर्ची, लोकसत्ता पक्षाचे माजी अध्यक्ष अनुराग केजरीवाल ही नावं आजच्या बातमीत आली आहेत. यातील अनेक नावं अजूनही उजेडात येणं बाकी आहेत. अनेक राजकारणी आणि खेळाडूंच्या नावाचीही चर्चा यात होण्याची शक्यता आहे.
अमिताभ बच्चन यांना चार कंपन्यांचे डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यातील तीन कंपन्या बहामास येथील आहेत. तर ऐश्वर्या राय बच्चनला एका कंपनीचे डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर तिला त्या कंपनीची शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आले.
ऐश्वर्या बच्चनच्या माध्यम सल्लागाराने सोमवारी सकाळी हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहेत.
जगात सर्वत्र सध्या याच कागदपत्रांची चर्चा आहे. येत्या दिवसांत आणखी कोणाची नावं उजेडात येणार, याची सर्वांना धाकधूक लागली आहे.