वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये 150 हून अधिक वर्षांपासून मंगळवारीच निवडणूक होते. अमेरिकेत दर 4 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होते. 1845 मध्ये अमेरिकी काँग्रेसने निर्णय घेतला होता की, प्रत्येक वेळेस नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवारच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी निवडणूक होईल. याबाबत यूएस काँग्रेसने एक प्रस्ताव पास केला होता आणि तेव्हापासून मंगळवारीच निवडणूक होत आहे. यामागे कोणतंही धार्मित कारण नाही. तर शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
अमेरिका तेव्हा एक कृषीप्रधान देश होता. त्यामुळे निवडणूकीसाठी नोव्हेंबर महिना शेतकऱ्यांना लक्षात ठेवून घेण्यात आला. उन्हाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये शेती केल्यास नुकसान होऊ शकतं. मंगळवारचा दिवस यासाठी की लांबून येणाऱ्या मतदारांचा रविवारचा दिवस व्यर्थ जाऊ नये. त्यांना चर्चमध्ये जाता यावं. त्यावेळेस अमेरिकेची अधिक लोकसंख्या ही शेतीकामांशी जोडलेली होती. मतदान करण्यासाठी येतांना ते लांबचा प्रवास घोड्याने करायचे. त्यावेळेस त्यांचा तो प्रवास एक दिवसापेक्षा अधिकचा असायचा.
अमेरिकेत त्यावेळेस शेतकरी शनिवारपर्यंत शेतात काम करायचे. रविवारी ते आराम करायचे आणि चर्चमध्ये जायचे. त्यामुळे त्या दिवशी मतदान ठेवल्यास कमी मतदान होण्याची शक्यता असायची. त्यामुळे जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक घेतली जाते.