www.24taas.com, माले
मालदीवचे माजी राष्ट्रपती महंमद नाशिद यांच्याविरुद्ध आज न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालायाच्या निर्णयामुळे मालदीव देशात आंदोलन आणि हिंसाचाराचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नाशिद सुरक्षित असल्याचा दावा नवनियुक्त राष्ट्रपती महंमद वाहिद हसन यांनी केला आहे.
मालदीवचे माजी राष्ट्रपती महंमद नाशिद यांच्यासह माजी संरक्षण मंत्र्यांविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना आणि कायद्याचे सक्तीने पालन केले जाईल, असे महंमद वाहिद हसन यांनी म्हटले आहे. त्यामुळे महंमद नाशिद यांच्या मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलन आणि हिंसाचार सुरू केला आहे.
दरम्यान, मालदीवमध्ये पोलीस कारवाई करण्यात येत आहे. नाशिद यांनी बडतर्फ केलेल्या न्यायाधीशांनीच त्यांच्या अटकेचा वॉरंट काढल्याने राजकीय गुंतागुंत वाढली आहे. यामुळे येथील वातावरण अधिक तापले आहे. संतप्त जमावाला काबूत आणण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे.
बंदुकीच्या बळावर राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचा दावा करून नाशिद यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मालदीवचे परराष्ट्रमंत्री महंमद नाशिम यांनी अमेरिका, ब्रिटन आणि भारताने यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.