भारत तालिबानपेक्षाही जास्त धोकादायक!

पाकिस्तानातील १० पैकी केवळ ५ नागरिकांना भारत मैत्री योग्य वाटतो. तर ५ नागरिकांना भारत हा तालिबान आणि अल-कायदापेक्षाही जास्त धोकादायक वाटतो.

Updated: Jun 29, 2012, 04:35 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

पाकिस्तानातील १० पैकी केवळ ५ नागरिकांना भारत मैत्री योग्य वाटतो. तर ५ नागरिकांना भारत हा तालिबान आणि अल-कायदापेक्षाही जास्त धोकादायक वाटतो. एखा सर्वेक्षणात पाकिस्तानातील सर्वसामान्य जनतेची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

‘प्यू रिसर्च सेंटर’च्या ‘ग्लोबल एटीट्यूड्स प्रोजेक्ट’मध्ये पाकिस्तानचं सर्वेक्षण करण्यात आलं. यात असं लक्षात आलं, की भारताकडे सकारात्मक दृष्टीने पाहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या २२% झाली आहे. गेल्या वर्षी हिच संख्या १४% होती. २००९मध्ये पहिल्यांदाच हे सर्वेक्षण केलं गेलं, तेव्हा भारताला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी होती. भारताला घाबरणाऱ्यांची संख्या ११ पॉइंट्सवरून ५९% एवढी वाढली आहे. तर तालिबानला घाबरणाऱ्यांची संख्या ९ टक्क्यांनी कमी झाली आहे.

 

सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात भारताबद्दल नकारात्मक भावना असूनही ६२% पाकिस्तानी लोकांना वाटतं की भारतासोबत संबंध सुधारायला हवेत. तर दोन तृतियांश लोकांना वाटतं की दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापार वाढावा आणि शत्रुत्व कमी होण्यासाठी बोलणी व्हावीत.

 

भारतामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्येही ५९% भारतीयांनी पाकिस्तानबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. २०११मध्ये हा आकडा ६५% इतका होता. पाकिस्तानबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये भारत हा एकमेव देश नाही. चीन, जपान तसंच मुस्लिमबहुल राष्ट्रं असणाऱ्या इजिप्त, जॉर्डन, ट्यूनिशिया या राष्ट्रांतील नागरिकांनीही पाकिस्तानलाच सर्वाधिक धोकादायक मानलं आहे.