www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले. सर्वोच्च न्यायालयाने गिलानी यांना कलम ६३-जी अंतर्गत दोषी ठरविले आहे. आज गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, गिलानी यांना न्यायालयाने कोणतीही शिक्षा सुनाविलेली नाही.
पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्याविरुद्धचे भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरु करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे गिलानी यांनी पालन न केल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल करण्यात आला होता. गिलानी यांनी झरदारी यांच्याविरुद्धचे भ्रष्टाचाराचे गुन्हे पुन्हा सुरु करण्याबाबत स्वित्झर्लंडमधील अधिकाऱ्यांना सांगण्यापेक्षा कारागृहात जाणे पसंत करू, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला होता.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिलेल्या गिलानी यांना दोषी ठरवित ते जेवढा वेळ न्यायालयात उपस्थित राहिले, तीच त्यांची शिक्षा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे पंतप्रधानांना एखाद्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गिलानी यांनी हा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे.