अयोध्या : अयोध्येत राम मंदिरांच्या बांधणीसाठी मोदी सरकार अनुकूल असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेनं केलाय. त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदच्या वतीनं रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी शिलापूजन झालं असून मंदिर बांधण्याची ही सुरूवात असल्याचा दावा केलाय.
रामसेवकपुरममध्ये रविवारी दोन ट्रक शिळा आणण्यात आल्या. महंत नृत्यगोपाल दास यांनी त्यांचं पूजन केलं. मोदी सरकारकडून मंदिर बांधण्याचे संकेत मिळालेत. आणि हीच योग्य वेळ आहे, असा दावाही नृत्यगोपाल दास यांनी केला. अयोध्येत अनेक भागातून शिळा येत असून, हे सत्र सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितलं.
अयोध्येतील या अचानक सुरू झालेल्या घटनांकडे पोलीस बारकाईने नजर ठेवून आहेत. शिळा अयोध्येत आलेल्या आहेत आणि त्या खासगी जागेत ठेवल्या आहेत. मात्र अजून पुढं काहीही झालेलं नाही असंही पोलिसांनी म्हटलंय. विश्व हिंदू परिषदेने गेल्या जून महिन्यात राम मंदिर उभारणीची घोषणा केली होती. गेल्याच महिन्यात विहिंपचे अशोक सिंघल यांचं निधन झाले.