बिहार : सरकारने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशातील सर्वच स्तरातून समर्थनाचे अथवा विरोधाचे सुर उमटू लागले आहेत. या निर्णयामुळे लग्नसमारंभांना देखील नोटांबंदीचा जबरदस्त फटका बसला आहे. नोटांबंदीचा निर्णयाला सामोरे जात बिहारमधील गरीघाट गावात केवळ ११०० रूपयांत एक लग्न पार पडलंय.
लग्नासाठी लागणारा खर्च हा लाख आणि कोटींच्या घरात असतो. परंतु बिहारमधील गरीघाट गावातील योगेंद्र सहनी या वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न केवळ ११०० रुपयांत पार पाडलं. गुरूवारी सरस्वती सहनी हिचं गावातील मुंशी सहनी यांचा मुलगा राजा कुमार याच्यासोबत विवाहसोहळा पार पडला.
या लग्नात पाहुण्यांसाठी पंचपकवानाऐवजी चहा आणि लाडू वाटण्यात आले होते. लग्नात कोणत्याही प्रकारचा शाही थाट नसता नाही वऱ्हाडानं विवाहसोहळ्यात हजेरी लावली. लग्नात कोणत्याही प्रकारचा हुंडा घेण्यात आला नव्हता.
लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडींनीही या लग्नाचं कौतुक केलंय. अशा प्रकारचे विवाह सोहळे देशात आदर्श निर्माण करू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय.
नवरी मुलगी सरस्वतीने सांगितले की, नोटाबंदी निर्णयामुळे खूप अडचणी आल्या कारण त्या आधीच आमच्या लग्नाची तारीख ठरवण्यात आली होती.
परंतू त्यानंतर आम्ही कमीत कमी खर्चात लग्न करण्याचे ठरवले.
नवरीच्या वडीलांनी सांगितले की, मुलीच्या लग्नात ३५० रूपयांची साडी, नवऱ्या मुलासाठी ४०० रूपयांचे कपडे, वरातीच्या स्वागतासाठी १५० रूपयांचे लाडू आणि २०० रूपयात चहाची व्यवस्था करण्यात आली होती.
नवरा मुलगा राजाने सांगितले की, लग्नाची तारीख निश्चित झाल्यामुळे, मध्येच ते रद्द करणे कठीण होते. लग्न कमी खर्चात झाले म्हणून मी आनंदी आहे. सगळी कडूनच खर्च कपात करण्यात आल्यामुळे चहा पाण्याच्या लग्नाचा निर्णय घेण्यात आला. सुरूवातीला ही कल्पना चांगली वाटली नाही, परंतू लोकांकडून मिळत असलेल्या चांगल्या प्रतिक्रियांमुळे गावात आमच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.