नवी दिल्ली : साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केला आहे.
फाशीच्या निर्णयाविरोधात आरोपी मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर भानुमती, आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने अंतिम निकाल दिला. २३ वर्षाच्या निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्घृण बलात्कार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं. त्यानंतर 29 डिसेंबरला सिंगापूरच्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी एकानं तुरूंगात आत्महत्या केली. सत्र न्यायालयानं चारही आरोपींनी फाशीची शिक्षा सुनावली.