'रिचार्ज फॉर्म्युला'नं १९ दिवसांत रोखले ११ बालविवाह!

मध्यप्रदेशात नुकतेच बालविवाह झाल्याचं उघडकीस आलंय... ही गोष्ट धक्कादायच पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे असे बालविवाह रोखण्यासाठी काही अधिकारी मनापासून प्रयत्न करतायत. 

Updated: Apr 22, 2016, 02:04 PM IST
'रिचार्ज फॉर्म्युला'नं १९ दिवसांत रोखले ११ बालविवाह! title=

मंदसौर : मध्यप्रदेशात नुकतेच बालविवाह झाल्याचं उघडकीस आलंय... ही गोष्ट धक्कादायच पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे असे बालविवाह रोखण्यासाठी काही अधिकारी मनापासून प्रयत्न करतायत. 

समाजाची बुरसटलेली विकृत मानसिकता बदलायला अजून किती बराच अवकाश आहे हे अधोरेखित करणारच मध्यप्रदेशातल्या बालविवाहांचं चित्र सांगतंय. पण त्यातल्या त्यात आशेचा किरण म्हणजे मध्य प्रदेशातल्या मंदसौरमधला एक उपक्रम...  बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांना रिचार्ज करणारी ही योजना... 

अधिकाऱ्यांचा पुढाकार

मंदसौरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी एक वेगळाच फॉर्म्युला शोधलाय. बालविवाहाची माहिती देण्यासाठी फोन करणाऱ्याच्या मोबाईलवर शंभर रुपयांचा रिचार्ज केला जातो. फोन आल्यावर माहिती पडताळून पाहिली जाते, बालविवाह रोखला जातो आणि मग फोन करणाऱ्याच्या नंबरवर शंभर रुपयांचं रिचार्ज केलं जातं.

मंदसौरमधले महिला सक्षमीकरण अधिकारी राधवेंद्र शर्मा यांची ही आयडिया.... ही योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या १९ दिवसांत ११ बालविवाह रोखण्यात आले.  

फॉर्म्युला ठरला हीट 

बालविवाह थांबवण्यासाठी १०० रुपये रिचार्जचा हा फॉर्म्युला इतका हिट झालाय की आता नीमच, रतलाम, उज्जैन आणि धार या दुसऱ्या जिल्ह्यांमधूनही फोन यायला लागलेत. सध्या शंभर रुपयांचा हा रिचार्ज अधिकारी स्वतःच्या खिशातून करतायत. अशा अधिकाऱ्यांना 'झी २४ तास'चा सलाम!