बहरायच : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिल्ली उडवण्यापेक्षा केलेल्या आरोपांना उत्तरं द्यावीत असं थेट आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे दिले तर भूकंप होईल, म्हणून मला बोलून दिलं जात नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींच्या या आरोपांची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली होती.
बरं झालं ते काही बोलले नाहीत. त्यांच्या बोलण्यामुळे भूकंप झाला असता तर पुढच्या दहा वर्षांमध्ये देश सावरला नसता, अशी खिल्ली पंतप्रधानांनी उडवली होती. काँग्रेसचा तरुण नेता सध्या भाषण द्यायला शिकत आहे. ते बोलू लागल्यामुळे मला आनंद होत आहे. हा तरुण नेता बोलला नसता तर भूकंप झाला असता, पण आता ते बोलल्यामुळे भूकंपाची सुतराम शक्यता नाही, असे चिमटे मोदींनी वाराणसीमध्ये झालेल्या सभेत काढले.