www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआयनं आरोप ठेवल्यानंतर काँग्रेस खासदार नवीन जिंदाल अडचणीत आलेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संसदीय समिती सदस्यत्वाचा काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपनं केलीये.
चोराला चौकीदारी करायला दिली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी जिंदाल यांच्यावर तोफ डागलीये. नवीन जिंदाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांनी सरकारी पदांचा राजीनामा देण्याची मागणी होतेय. नवीन जिंदाल गृह मंत्रालयावर संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहे. जिंदाल या पदांवर कायम राहिल्यास निष्पक्षपणे चौकशी होणार नाही, असा आरोप विरोधी पक्षानं केलाय.
पवन बन्सल, अश्वनी कुमार या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आलं. बीसीसीआय अध्यक्ष एम.श्रीनिवासन यांनीही आपली जबाबदारी सोडली. त्यामुळं या सर्वांनंतर आता नवीन जिंदाल यांनीही आपल्या सरकारी पदांचा राजीनामा द्यावा काय? असा प्रश्न विचारला जातोय.
नवीन जिंदाल आणि जेएसपीएलच्या चार कंपन्यांविरोधात सीबीआयनं एफआयआर दाखल केल्यानंतर विरोधी पक्षांनी सवाल उपस्थित केलाय. नवीन जिंदाल संसदेच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य आहेत.
नवीन जिंदाल गृहमंत्रालयावरच्या संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत. या पदावर कायम राहिल्यास निष्पक्षपणे चौकशी होऊ शकणार नाहीत. नवीन जिंदाल आपले हितसंबंध जपण्याची शक्यता आहे. तसंच ते या पदावर राहून सीबीआयच्या चौकशीत अडथळा आणण्याची शक्यता आहे. त्यामुळंच विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत.
विरोधी पक्षांनीच नाही तर सरकारनंही नवीन जिंदाल यांना आपल्या पदांचा त्याग करावा लागू शकतो असे संकेत दिलेत.
नवीन जिंदाल संरक्षण आणि उड्डाण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचेही सदस्य आहे. त्यामुळं आता त्यांच्यावर संसदीय पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्यासंदर्भात दबाव चांगलाच वाढत चाललाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.