नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना कोर्टानं समन्स बजावल्यानंतर दिल्लीमध्ये आज राजकीय नाट्य रंगलं. त्यांना अटक होणार की जामीन मिळणार? या प्रश्नाभोवती राजकारण केंद्रित झालं होतं. त्याला साथ होती ती निदर्शनांची आणि घोषणांची... आणि यामुळेच नवी दिल्लीचा शनिवार नाट्यमय घडामोडींचा ठरला.

Updated: Dec 19, 2015, 07:09 PM IST
नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है! title=

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना कोर्टानं समन्स बजावल्यानंतर दिल्लीमध्ये आज राजकीय नाट्य रंगलं. त्यांना अटक होणार की जामीन मिळणार? या प्रश्नाभोवती राजकारण केंद्रित झालं होतं. त्याला साथ होती ती निदर्शनांची आणि घोषणांची... आणि यामुळेच नवी दिल्लीचा शनिवार नाट्यमय घडामोडींचा ठरला.

कारण होतं नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस श्रेष्ठींना कोर्टानं बजावलेलं समन्स... दुपारी तीन वाजण्यापू्र्वी हजर राहण्याचे आदेश पतियाळा हाऊस कोर्टानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिले होते. गांधी माता-पुत्र अटक करून घेणार? की जामीन मिळवणार? याबाबत गूढ आणि उत्सुकता होती. इंदिरा गांधींप्रमाणे अटकेचं 'पॉलिटिकल मायलेज' घेण्याचा सोनिया आणि राहुल यांचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगल्यामुळे राजधानीत तणावाचं वातावरण होतं. 

१० जनपथचं सोनियांचं निवासस्थान, अकबर रोडवरचं काँग्रेस मुख्यालय  आणि पतियाळा हाऊस कोर्ट... या सर्व ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर होते. या प्रकरणाचा राजकीय फायदा उचलण्याची पूर्ण तयारी काँग्रेसनं केल्याचं स्पष्ट दिसत होतं... मोदी सरकारविरोधात ठिकठिकाणी निदर्शनं केली जात होती.

पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेल्या पतियाळा हाऊस कोर्ट परिसरात काँग्रेस नेते जमण्यास सुरूवात झाली. सोनिया-राहुल यांचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, प्रियांका वडेरा, रॉबर्ट वडेरा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे पतियाळा हाऊस कोर्टात हजर झाले. दुपारी ३.५० वाजता सोनिया गांधी आणि राहुल गांधीदेखील कोर्टात आले. ते कोर्टरुममध्ये पोहोचताच सुनावणी सुरू झाली... आणि दुपारी ४ वाजता अवघ्या दोन मिनिटांमध्ये सुनावणी संपलीही... 

सोनिया-राहुल गांधी बाहेर आले. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला विरोध फेटाळून कोर्टानं दोघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला. काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्यावर सोनिया आणि राहुल गांधी पत्रकारांना सामोरे गेले. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

भाजपानं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. नॅशनल हेरॉल़्ड प्रकरणाची पुढली सुनावणी आता २० फेब्रुवारीला होणार आहे. यावेळीही सोनिया आणि राहुल गांधींना हजर रहावं लागणार आहे. त्या सुनावणीत आपण अधिक प्रबळ पुरावे दाखल करू, असा दावा याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.

एकूणच राजधानीसाठी हा विकेन्ड नाट्यमय घडामोडींचा होता... काँग्रेस हा नॅशनल फार्स करत असल्याची टीका भाजपानं केली, तर भाजपा सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय... लेकीन... ये पब्लिक है, ये सब जानती है...