पाटणा : बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका महिलेला ती केवळ 'विधवा' आहे म्हणून 'मीड डे मील' बनवण्यापासून रोखण्यात आलं होतं... पण, इथल्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मात्र या गावकऱ्यांना जोरदार चपराक लगावलीय.
काही दिवसांपूर्वी सुनिता नावाच्या एका विधवा महिलेनं शाळेत विद्यार्थ्यांना दिलं जाणारं जेवण बनवलं म्हणून अगडी जातीच्या लोकांनी संपूर्ण शाळेलाच घेराव घातला. इथवरच ते थांबले नाहीत तर त्यांनी शाळेचा ताबा घेत शाळेला कुलूपही ठोकलं. विधवेनं जेवण बनवलं तर चांगलं होणार नाही, अशी धमकीही त्यांनी शाळा प्रशासनाला दिली होती.
स्थानिक जिल्हा दंडाधिकारी डी. एम. राहुल कुमार यांच्यापर्यंत ही गोष्ट जेव्हा पोहचली तेव्हा ते स्वत: इथल्या शाळेत दाखल झाले. इतकंच नाही तर या महिलेला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवत त्यांनी या महिलेला जेवण बनवण्यास सांगितलं आणि ते खाल्लंही...
धडाडी दाखवून लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यात पुढाकार घेणाऱ्या राहुल कुमार यांचं यामुळे मोठं कौतुक होतंय.