www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसनं नरेंद्र मोदींच्या जाती कार्डच्या मुद्यावर पलटवार केलाय. नरेंद्र मोदी सवर्ण असून मात्र 2001 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली जात ओबीसी केल्याचा आरोप काँग्रेस नेते शक्ति सिंह गोहील यांनी केलाय.
गोहील यांच्या मते मोदी मोद घंचीस जातीचे आहेत. मात्र त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सप्टेंबर 2001 मध्ये ओबीसीच्या यादीत ती जात समाविष्ट केली. मात्र काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचं गुजरात सरकारनं अधिसूचना जारी करून सांगितलंय.
तसंच मोदींच्या जातीचा काँग्रेसच्या राजवटीतच ओबीसीमध्ये समावेश झाला असल्याचा दावा भाजपा नेते अरुण जेटली यांनी केलाय. दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांनाही एसपीजी सुरक्षा देण्यात येईल असं चित्र आहे.
एसपीजी कायद्यानुसार पंतप्रधान आणि त्यांचे कुटंबिय यांना धोका असो किंवा नसो एसपीजीची सुरक्षा द्यावीच लागते. मोदी यांनी जशोदाबेन यांचा उल्लेख पत्नी असा केल्यानं जर मोदी पंतप्रधान झाले तर जशोदाबेन यांनी एसपीजी सुरक्षा द्यावीच लागेल, मोदी आणि जशोदाबेन फार काळ एकत्र राहिले नसले तरी मोदी पंतप्रधान झाल्यास जशोदाबेन यांचेही आयुष्य बदलून जाणार आहे.
सुरक्षा यंत्रणांमुळे त्यांच्याकडे लक्ष वेघले जाईल. जशोदाबेन सध्या मेहसाना जिल्हातील ब्राम्हणवाडा गावात आपल्या भावासोबत राहतात. मोदी जर पंतप्रधान झाले तर या गावात सुरक्षा यंत्रणांचा वावर वाढणार आहे. तर दुसरीकडे केंद्रामध्ये भाजप आणि मोदी सरकार आल्यास त्यांना पाठिंबा देणार नसल्याचं बसपा अध्यक्षा मायावती यांनी स्पष्ट केलंय. त्या लखनऊमध्ये बोलत होत्या. मोदींमुळे देशात कटुता निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.