बंगळुरू : कर्नाटकच्या कुडलिगीच्या पोलीस उपअधीक्षक (DSP) अनुपमा शेनॉय यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात.
'रिजाइन्ड अॅन्ड जॉबलेस' (राजीनामा आणि बेरोजगार) असं या पोस्टवर त्यांनी लिहिलंय. याआधीही अनुपमा शेनॉय चर्चेत आल्या होत्या त्या मंत्री महोदययांना नाराज केल्यामुळे... कर्नाटकचे मंत्री पी टी परमेश्वर नायक यांना फोनवर ताटकळत ठेवल्यामुळे शेनॉय यांची बदली करण्यात आली होती. अनुपमा यांची बदली करण्याची चर्चा करताना पीटी नायक यांचा व्हिडिओही बराच गाजला होता.
त्यामुळे निराश झालेल्या शेनॉय यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 'मी तर राजीनामा दिलाय... तुम्ही कधी देणार?' असं सरळ सरळ आव्हानंच त्यांनी मंत्रीमहोद्यांना फेसबुकवर दिलंय. फेसबुक टाकलेल्या पोस्टनंतर अनेक युजर्सनं शेनॉय यांना पाठिंबा दर्शवलाय.
राजकारण्यांनी आपल्या कामात ढवळाढवळ करावी, हे शेनॉ़य यांना मान्य नव्हतं. तसंच नोकरी गेली तर दारु माफियांच्या दबावाला बळी पडणार नाही, अशीही भूमिका त्यांनी व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांनी मात्र या प्रकरणावर सावध भूमिका घेतलीय. आपल्याला शेनॉय यांच्या राजीनाम्याबद्दल माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय.