www.24taas.com, नवी दिल्ली
जनलोकपालाचा अण्णांचा अजेंडा आता बाबा रामदेव यांनी आपल्या हाती घेतलाय. लोकपालाबाबत संशोधन होत राहिल मात्र विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी बाबा रामदेवांनी केलीय. तीन दिवस बाबांचं लाक्षणिक उपोषण असणार आहे. त्यानंतर ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत.
लोकपाल विधेयकाबाबत सरकार ज्या पद्धतीनं भाषेचा वापर करत आहे त्याबाबत असमाधान व्यक्त केलंय. अण्णांच्या सामाजिक अजेंड्याला आपलं समर्थन करत राजकीय अजेंड्यापासून दूर राहणार असल्याचं बाबांनी स्पष्ट केलंय. मुख्य निवडणूक आयुक्त, सीबीआय आणि सीव्हीसींची नियुक्ती निपक्षपातीपणे व्हायला हवी अशी मागणीही रामदेवांनी केली आहे.
बाबा रामदेवांच्या आंदोलनाची काँग्रेसनं खिल्ली उडवलीय. दिल्लीत दरवर्षी रामलीला होत असते असं सांगत बाबा रामदेवांवर उपहासात्मक टीका केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी केलीय.पावसाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर लोकपाल विधेयक पुन्हा चर्चेत आलंय. लोकपाल विधेयकाबाबत सिलेक्ट कमिटीचा अहवाल 3 संप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे. अहवाल आल्यास सुरू असलेल्या पावसाळी अधिवेनातच विधेयक मांडले जाण्याची शक्यता संसदिय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी व्यक्त केलीय.
बाबा रामदेवांनी रामलीलावर आंदोलन सुरू करताच वादाला तोंड फुटलंय. बाबा रामदेवांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणा-या बाळकृष्ण यांचं रामलीला मैदानावर शहीद भगतसिंग, महात्मा गांधी, सुभाषचंद बोस यांच्या बरोबरीने पोस्टर झळकविण्यात आलं. बाळकृष्ण यांना शहिदांबरोबर पोस्टरवर झळकविण्याचा हा उपद्व्याप बाबांच्या अंगलट येण्याची शक्यता दिसताच, ही पोस्टर्स तातडीने हटविण्यात आली.
देशासाठी बलिदान देणा-या या महान हस्तींमध्ये बाळकृष्ण यांना झळकविण्याचा हा खटाटोप कशासाठी, हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. अखेर प्रसिद्धी माध्यमांमधून टीका होऊ लागल्यानंतर बाळकृष्ण यांना झळकविणारी ही पोस्टर्स तातडीने हटविण्यात आली.