होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा

पूर्वाश्रमी अतिरेकी असलेले काश्मीरमधले काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी टायगर मेमनचे पाकिस्तानशी किती घनिष्ट संबंध आहेत, यावर प्रकाश टाकलाय.

Updated: Jul 31, 2015, 11:19 AM IST
होय, मी टायगरला पाकिस्तानात भेटलो होतो; काँग्रेस आमदाराचा खुलासा title=

मुंबई : पूर्वाश्रमी अतिरेकी असलेले काश्मीरमधले काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी टायगर मेमनचे पाकिस्तानशी किती घनिष्ट संबंध आहेत, यावर प्रकाश टाकलाय.

'आपण अतिरेकी प्रशिक्षणासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलो असताना टायगरशी भेट झाल्याचं माजिद यांनी सांगितलंय. यावेळी झालेल्या संभाषणाचा तपशिलच त्यांनी  'डीएनए' या झी मीडियाच्या वृत्तपत्राशी बोलताना दिलाय.

'ही 1993 सालातली घटना आहे...मी टायगरला भेटलो होतो... आमची दोन - तीन वेळी भेट झाली. तो पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादला नेहमी येत होता. मी काही त्याचा मित्र नव्हतो. हिलाल बेग यानं आमची ओळख करून दिली होती' असंही त्यांनी सांगितलंय.

याकूब मेमनला भारतात अटक झाल्यानंतर टायगरला आयएसआय आपल्याला संपवेल अशी भीती वाटत होती... त्यामुळे तो दुबईला पळाला होता... नंतर टायगर भारतीय तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करेल या भीतीपोटी आयएसआयनं त्याच्याशी समझोता केला आणि त्याला परत पाकिस्तानात आणलं, असा गौप्यस्फोट उस्मान माजिद यांनी केलाय. 

टायगर दुबईत पळून जाण्याआधी ऐशोआरामात राहात होता. त्याला मोठं घर आणि 3 आलिशान गाड्या देण्यात आल्या होत्या, असंही माजिद यांनी सांगितलंय.

१९९३ दरम्यान उस्मान हेदेखील बांग्लादेशातून पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी दाखल झाले होते. पण, दोन वर्षानंतर मात्र त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर मात्र त्यांनी मुख्य प्रवाहात दाखल होऊन विधानसभा निवडणूक लढवली. २००२ मध्ये ते बंदिपोरा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी-काँग्रेस सरकारदरम्यान त्यांना मंत्रिपदही मिळालं. 

२००८ साली मात्र विधानसभा निवडणुकीत पीडीपीच्या उमेदवारानं त्यांना पछाडलं. पण, २०१४ साली मात्र काँग्रेसच्या तिकीटावर लढलेल्या उस्मान यांना पुन्हा विजय मिळाला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.